काँग्रेसचा जाहीरनाम्यासंदर्भात जनतेला आकर्षित करण्याचा ‘हा’ निर्णय
'This' decision was taken to attract the people regarding the Congress manifesto

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेस पक्ष थेट जनतेशी संवाद साधणार आहे. मतदारांना
ऑनलाईनद्वारे सुद्धा काँग्रेसकडे आपल्या सूचना व प्रस्ताव पाठविता येणार आहेत. या सूचनांचा विचार करून काँग्रेस पक्ष निवडणूक जाहीरनामा तयार करणार आहे.
काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीची काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती.
यात लोकांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, याचे प्रतिबिंब निवडणूक जाहीरनाम्यात पडले पाहिजे, या प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले होते.
यामुळे समितीच्या प्रत्येक सदस्याला दोन राज्यांची जबाबदारी दिली जाणार आहे. हे सदस्य त्या राज्यांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोठ्या शहरांमध्ये तसेच जिल्हा पातळीवर लोकांशी थेट संवाद साधणार आहेत.
प्रदेश काँग्रेस व जिल्हा पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा व तालुका पातळीवरही मेळावे घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.
जनतेकडून मिळालेल्या सूचनांचा अंतर्भाव जाहीरनाम्यात करण्यात येईल. हा जाहीरनामा जनतेचा राहील, असे पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्या लोकांपर्यंत पक्ष पोचू शकणार नाही किंवा ते पक्षांपर्यंत येऊ शकत नाही, त्या लोकांना डिजिटल माध्यम काँग्रेस पक्षाने उपलब्ध करून दिले आहे.
पक्षाचे www.awaazbharatki.in हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर सूचना देता येणार आहे. तसेच awaazbharatki@inc.in या मेल आयडीवर मतदारांना आपल्या सूचना किंवा प्रस्ताव पाठविता येणार आहे.
या प्रस्तावांचा विषयनिहाय वर्गीकरण केल्यानंतर या सूचना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही पी. चिदंबरम यांनी सांगितले. यावेळी जाहीरनामा समितीचे समन्वयक टी. एस. सिंगदेव उपस्थित होते.