दोन्ही राष्ट्रवादीचे ‘हम साथ साथ है’ ?
'Hum Saath Saath Hai' of both nationalists?

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले असली तरी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मात्र दोन्ही गटांतील आमदारांसाठी एकच कार्यालय राहणार आहे. या माध्यमातून उपमुख्यममंत्री अजित पवार गटाच्यावतीने आम्ही एकत्रच असल्याचा संदेश दिला जात असल्याचे समजते.
या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. मंत्री, आमरांचे कक्ष सजवले जात आहेत. विधानभवन परिसरात आमदारांना बसण्यासाठी पक्षनिहाय स्वतंत्र कार्यालय दिले जाते.
मागील अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांना स्वतंत्र कक्ष देण्यात आले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी यावरून मोठा वाद झाला होता.
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतला होता. हा वाद अध्यक्षांपर्यंत गेला. त्यानंतर एकाच कक्षाचे विभाजन करण्यात आले होते.
मात्र, आपसात वाद होऊ नये म्हणून नंतर उबाठाच्या आमदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात घेता अजित पवार आणि शरद पवारांच्या गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात येतील,
अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र अद्याप एकाही गटाने स्वतंत्र कार्यालयाची मागणी केलेली नाही. त्यामुळे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील
आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एकाच कार्यालयात बसून कामकाज करावे लागणार आहे.
सध्या राष्ट्रवादी कोणाची यावरून मोठा वाद सुरू आहे. प्रकरण न्यायालयात गेले आहे. दोन्ही गटांच्यावतीने शपथपत्र सादर केले जात आहे.
आमचीच राष्ट्रवादी खरी असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अलीकडे सुनील तटकरे यांनी नागपूरमध्ये बोलताना अजित पवार गटालाच पक्षचिन्ह मिळेल, असा दावा केला.
दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचा वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळ राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रवी राणा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सातत्याने अजित पवार हे शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी मोदींसोबत यावं, ज्यामुळे राज्याचं भलं होईल, राज्य सरकार मजबूत होईल, जनतेचे काम होतील. मला वाटतं की, पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात गोष्टी मान्य केल्या असतील.
कुठंतरी पवार साहेबांच्या भेटीत अनेक रहस्य दडलेली आहेत. लगेच अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली, तेथे राजकीय चर्चा सुद्धा झाली असेल.
मोदीजींचं काम बघून नक्कीच पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्यासाठी पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील, असं सध्या चित्र आहे असेही रवी राणा म्हणाले आहेत.
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट झाली. त्यानंतर अजित पवार लगेच दिल्लीच्या दिशेने रवाना झाले .
अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या दोन्ही भेटींनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान या भेटीसंदर्भात आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे.