मराठेशिवाय इतर जातीतही कुणबी नोंदी,आता त्यांनाही मिळणार आरक्षण ?
Apart from Marathas, Kunbi records in other castes, now they will also get reservation?
मराठा समाजाच्या आरक्षण प्रक्रियेत कुणबी नोंदी तपासणी सुरू आहे. लातूर जिल्ह्यात मराठेतर जातीतही कुणबी नोंदी आढळल्यामुळे
त्यांना ओबीसी आरक्षण मिळू शकते का अशी चर्चा सुरू आहे. तर अशा पोटजातीसुद्धा मुख्य जातीच्या दाखल्यास पात्र आहेत, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
राज्यात मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्यासाठी माजी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यात येत आहेत. या मोहिमेत लिंगायत, मारवाडी यांच्यासह इतर मराठेतर जातींच्याही कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
त्यामुळे कुणबी नोंद असलेल्या इतर जातींनाही ओबीसी आरक्षण मिळू शकेल का, अशी चर्चा सुरू आहे. महसूल प्रशासन गतीने नोंदी तपासत आहेत.
अनेक तालुक्यात पाच हजारांपेक्षा जास्त नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे काही लाख मराठा कुटुंबांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, मराठेतर जातीतील कुणबी नोंदीबाबत प्रश्नचिन्ह आहे.
या जातींनीही आरक्षणाचा दावा केल्यास सरकारसमोर नवीन प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, नोंदींच्या आधारावर इतर जातींनाही आरक्षण लागू होऊ शकते असे आरक्षण अभ्यासकांनी म्हटले आहे.
‘लातूर जिल्ह्यात मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी नोंदी आढळल्या आहेत. विजय वडेट्टीवार यांनी यावर उपहास केला. कारण त्यांना आरक्षण कसे दिले जाते याची माहिती नाही,
असे डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले. ३० ऑगस्ट १९६८ च्या पत्रानुसार नोंदीत ओबीसी यादीतील मुख्य जातीचा उल्लेख असेल तर त्या पोटजाती मुख्य जातीच्या दाखल्यास पात्र आहेत, असे सराटे यांनी सांगितले.
२६ सप्टेंबर २००८ च्या संपूर्ण ओबीसी यादीत अनेक पोटजाती आरक्षण घेत आहेत. मारवाडी न्हावी (न्हावी पोटजात), लिंगायत वाणी (वाणी पोटजात), लेवा पाटीदार (कुणबी पोटजात), लिंगायत माळी, लिंगायत न्हावी,
लिंगायत कुंभार अशा सगळ्या जातींना आरक्षण मिळते. त्यामुळे मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, इत्यादी पोटजातीसुद्धा नोंद असल्यास आरक्षणास पात्र ठरतात. प्रचलित आरक्षण असेच दिले जाते.असे अभ्यासकांचे मत आहे