काँग्रेसच्या 45 आमदारांमधून अशोक चव्हाण यांच्या सोबत किती, हे आज रात्री कळणार
It will be known tonight how many of the 45 Congress MLAs are with Ashok Chavan

अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी मुंबईतल्या वाय बी सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली.
पवारांसोबतच्या बैठकीत राज्यसभेची निवडणूक आणि उमेदवारासंदर्भा चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील काही आमदार
भाजपच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी लागणाऱ्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठीही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अशोक चव्हाण राजीनाम्यावरुन भाजपवर टीका केलीय. स्वत:च्या कामगिरीवर जिंकता येत नाही, इतर पक्ष फोडून घर सजवण्याचं काम सुरु आहे असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय.
तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसंबंधी प्रभारींशी चर्चा होणार असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. तसंच एक नेता गेल्याने पक्षाला काहीही फरक पडत नसल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
दरम्यान, हायकमांडनं प्रदेश काँग्रेसला बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय.
चव्हाणांसोबत आणखी किती नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत याचा वेध या बैठकीत घेण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे यावरही चर्चा करण्यात येणार आहे.
45 आमदारांमधून आता चव्हाणांनी राजीनामा दिलाय. तर सुनील केदार हे बँक घोटाळ्यात दोषी आढळल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय.
तर बाबा सिद्दिकी अजित पवार गटात गेल्यामुळे झिशान सिद्दिकीबाबत काँग्रेसला शाश्वती नाही. या सर्व विषयांवर चर्चा कऱण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहावर तोडगा काढण्याच्या आता जोरदार हालचाली सुरु झाल्यात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरील पक्षांतर्गत रोष कमी करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना पुन्हा ताकद दिली जाणार आहे असं समजतंय..
बाळासाहेब थोरातांना राज्यसभा निवडणूक आणि पक्ष संघटना बांधण्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.. मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांच्याकडून थोरातांना कॉल आल्याचीही माहिती मिळतेय.
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्यात..
नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून हालचाली सुरु झाल्यात.. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा निर्णय होणार हे जवळपास निश्चित झालंय..
अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय, एकनाथ शिंदेंसोबतच काँग्रेस सोडण्याचं चव्हाणांचं ठरलं होतं
असा दावाही राऊतांनी केलाय. तर काँग्रेसमधून नेते घेऊन भाजप एकप्रकारे काँग्रेसशी युती करतंय असा टोलाही राऊतांनी लगावलाय..