अजित दादांचा पुतण्याही विरोधात शरद पवार गटाचा प्रचार करणार ?
Will Sharad Pawar group campaign against Ajit Dada's nephew?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेत वेगळी भूमिका घेतली. आता त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे देखील शरद पवार यांच्यासोबतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युगेंद्र पवार बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार कार्यालयास बुधवारी (ता. 21) भेट देऊन शरद पवार गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. शरद पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष अँड. संदीप गुजर यांनी ही माहिती दिली.
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजिव आहेत. ते सक्रीय राजकारणात नाहीत, युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात.
व्यावसायिक जबाबदा-या ते सांभाळतात, मात्र आता ते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मध्यंतरी बारामतीच्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपले कुटुंब एकटे पडले असल्याचा उल्लेख केला होता, त्यांचे सख्खे पुतणेच आता शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्यंतरीच्या राजकीय घडामोडींच्या काळात अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या घरी दिसले होते. आता बदलत्या परिस्थितीत अजित पवार यांच्या पुतण्याने वेगळी राजकीय भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
कुटुंबिय सोबत नसले तरी बारामतीची जनता माझ्या सोबत असल्याचे अजित पवार यांनी बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखविले होते.