फडणवीसांना माझा जीव घ्यायचा आहे असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने
Jarange towards Mumbai saying Fadnavis wants to kill me
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर आतापर्यंत आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळविला आहे.
उपमुख्यमंत्र्यांना मला मारायचं आहे, मी थेट आता सागर बंगल्यावर निघालो आहे, असे म्हणत जरांगे अंतरवालीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
अंतरवालीत मराठा समाजाचा मोठा जत्था जरांगे यांच्या गाडीसमोर उभा आहे. पाटील तुम्ही आधी उपचार घ्या, आम्हाला आरक्षणाइतकाच तुमचा जीव महत्वाचा आहे.
आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. तुमच्या मुंबईला जाण्याच्या मताशी आम्हीही सहमत आहोत, पण आधी तुम्ही रुग्णालयात जाऊन उपचार घ्या, अशी विनंती सकल मराठा समाजाने केली. परंतु जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत.
जरांगे रडत रडत म्हणाले, “मराठा समजाने माझ्या गाडीची वाट सोडावी. कृपा करून माझी गाडी अडवू नका. फडणवीसांना माझा जीव घ्यायचा आहे. सत्ता आणायची असेल तर जरागेंना मारावं लागेल, हा त्यांचा प्लॅन आहे”.
“मला मुंबईला जाऊद्यात. फडणवीसांना माझा जीव घेऊ द्यात. मला वाटेत पोलिसांनी मारलं तरी चालेल. पण ओबीसीतून आरक्षण घेणारच. माझ्या समाजाचा विश्वास तुटू देणार नाही, एकजूट तुटू देणार नाही.
मराठ्यांनो, तुम्ही काळजी करू नका, आरक्षण घेऊनच येतो. हा फुटत नाही-याला मारून टाकू- किंवा पोलिसांच्या हाताने एन्काऊंटर करू, हा बामणी कावा सुरू झालाय”, असे सनसनाटी आरोप करून मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर तोंडसुख घेतलं.
मी ब्राह्मण आहे आणि मी मराठा समाजाला हरवून दाखवेन, असे फडणवीसांना वाटते. मी आतापर्यंत त्यांना कधीच जातीवरून बोललो नव्हको. फडणवीसांचं जर कुणी ऐकलं नाही, तर ते माणसं संपवतात.
त्यांचं जो ऐकणार नाही, त्याला संपवलं जातं. त्यांच्या पुढे कुणी गेलेलं, त्यांना खपत नाही. एखादी जात मोठी झालेली त्यांना चालत नाही.
त्यांची गुलाम होऊन ऐकणारी जातच त्यांना लागते. त्यामुळेच मला बदनाम करून मला संपविण्याचा त्यांचा कट आहे, असा अतिशय गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाइमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता असा धक्कादायक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या पण चाळे बंद करा असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच मी मराठ्यांचा पोट्टा आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला आयुष्यातून उठवेन असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
सरकारने दिलेले स्वतंत्र मराठा आरक्षण आम्हाला मान्य नाही. सरकारला सगेसोयरेची अंमलबजावणी करावीच लागेल त्याशिवाय सरकारला सोडणार नाही असे म्हणत जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताबदलावरुनही देवेंद्र फडणवीसांवर निशाना साधला. सरकारवर देवेंद्र फडणवीस यांचा होल्ड असून मुख्यमंत्री शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फडणवीसांचे ऐकावं लागतं असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी घ्यायचा असेल तर मी आताच सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला असे आव्हानच मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
यावेळी मनोज जरांगे यांनी ताडकन उठत फडणवीसांच्या बंगल्याकडे जाण्याची भूमिका घेतल्याने अंतरवाली सराटीत एकच गोंधळ उडाला. यानंतर स्थानिकांकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.