शिंदे, अजित पवारांमुळे महायुतीत जागावाटपाचा पेच?
Shinde, Ajit Pawar because of the embarrassment of seat distribution in the Grand Alliance?

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभेच्या जागांनुसार, सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ५१ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.
तर महाराष्ट्रातून एकही नाव अद्याप ठरलेलं नाही. महाराष्ट्रातून अद्याप एकही उमेदवार न दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचं एकमत होत नसल्याचं बोललं जात आहे.
लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा ही भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली. पण, ते स्वत:च्याच राज्यातील उमेदवार जाहीर करु शकले नाहीत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, महाराष्ट्रात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत लोकसभा निवडणूक लढणार आहे. सध्या जागा वाटपबाबत चर्चा सुरु आहे.
जागा वाटप निश्चित झाल्यावर महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं जाहीर केली जातील. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सांगितलं होतं की राज्यात लोकसभा जागावाटपबाबत महायुतीत चर्चा सुरु आहे. लवकरच याची घोषणा केली जाईल.
मुंबईच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे.
जौनपूर जागेसाठी मुंबईचेच ज्ञान प्रकाश सिंह देखील इच्छूक होते. गेल्या पाच वर्षांपासून ते तिथे सक्रियपणे काम करत आहेत.
पण, पक्षाने कृपाशंकर सिंह यांची निवड केली. जौनपूर ही कृपाशंकर सिंह यांची जन्मभूमी आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही काँग्रेस पक्षाचून झाली होती.
काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेचं सदस्य बनवलं होतं. त्यानंतर त्यांनी कालीना येथून निवडणूक लढली आणि जिंकलीही. त्यानंतर त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आलं.
त्यानंतर त्यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही देण्यात आलं. मात्र, काही काळाने त्यांच्यात आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपात प्रवेश घेतला.
त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. पण, त्यांना जौनपूरची जागा देण्यात आली.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात एकूण १९५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. १६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांचा यात समावेश आहे.
पण महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश भाजपच्या यादीत नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जागावाटपचा तिढा कायम आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे मतदारसंघातील पेच वाढत चालले आहेत.
गेल्या वेळी निवडून आणलं, आता या निवडणुकीत मीच पाडणार, असं थेट आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना दिलं आहे.
कोल्हे यांच्याविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील लढण्यास उत्सुक आहेत. मागील निवडणुकीत कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला होता. युतीत ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल असं दिसतंय. त्यामुळे आढळराव घड्याळ हाती घेण्याची चिन्हं आहेत.
आढळरावांच्या पक्षप्रवेशाला आणि उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
मी २० वर्षे आढळराव पाटलांविरोधात संघर्ष करतोय. आढळरावांना पक्षप्रवेश दिल्यास बाकी आमदार नाराज होतील. मलाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत मोहिते पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक आहेत. त्यांचाही आढाळरावांच्या उमेदवारीला विरोध आहे. ‘२०१९ मध्येही मी लोकसभा लढवण्यास उत्सुक होतो.
पण निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंना संधी देण्यात आली. अजित पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सांगण्यावरुन कोल्हेंसाठी काम केलं.
पण आता पुन्हा आयात उमेदवारालाच संधी दिली जात असेल तर काही गोष्टींचा विचार करावा लागेल,’ असं लांडे म्हणाले.