उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी,मग काय घडले ?
Slogans in the name of Sharad Pawar in Deputy Chief Minister Ajit Pawar's meeting, then what happened?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघात चांगल्याच घडामोडी घडत आहेत. त्यात नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मेळावा आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पार पडला.
या मेळाव्यात जुन्नरचे आमदार अतुल बेनके बोलत असताना भर सभेत एका व्यक्तीने शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. त्यामुळे भाषण सुरू असताना सर्वांचे लक्ष या व्यक्तीने वेधले.
मात्र अतुल बेनके बोलत असताना त्यांनी या व्यक्तीकडे लक्ष देऊ नका, आसे सांगितले. लाऊड स्पिकरचा आवाज मोठा करत या व्यक्तीची घोषणा दाबण्याचा प्रयत्न केला गेला.
नंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांना बाजूला नेले. त्यामुळे काही वेळ एकच गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
४ मार्च रोजी मंचर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी सर्वांची भाषणं सुरू होती. त्यानंतर आमदार अतुल बेनके हे भाषणासाठी उभे राहिले. भाषणं सुरू असताना मागच्या बाजूला असलेला एका व्यक्तीने भर सभेत शरद पवार यांच्या नावाची घोषणाबाजी केली.
अतुल बेनके यांनी त्याच्याकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्या व्यक्तीला बाजूला नेण्यात येऊन मारहाण केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
शिरूर तालुक्यातील पाबळ येथे काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यत वेळी असा प्रकार घडला होता. दिलीप वळसे पाटील यांचे भाषण सुरू असताना शरद पवार यांचे समर्थक आक्रमक होत त्यांनी
शरद पवार यांच्या नावाने घोषणबाजी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत आपल्यालाही
आस्था असल्याचे सांगत भाषण आटोपते घेतले होते. त्यामुळे वळसे पाटील यांच्या मतदार संघात हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे.
दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अंत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. ते शरद पवार यांची साथ सोडतील असे कुणालाही वाटत नव्हते.
मात्र त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले. त्यामुळे सर्व सामान्यांच्या हा रोष तर नाही ना? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.