जागावाटप ;भाजपमुळे शिवसेना, राष्ट्रवादीत अस्वस्थता
Seat distribution: Uneasiness in Shiv Sena, NCP due to BJP
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं ३५ उमेदवारांची यादीही तयार केली आहे. मित्रपक्षांना १३ ते १६ जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे.
त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. अधिक जागा न लढवल्यास राजकीय अस्तित्त्व कसं टिकवणार, असा प्रश्न या पक्षांना पडला आहे.
उमेदवाराची ताकद आणि पक्षाची विजयी होण्याची क्षमता या दोन निकषांवर जागावाटप होणार असल्याचं भाजपच्या एका बड्या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.
शिंदेंना त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांचे मतदारसंघ हवे आहेत. भाजपला अधिकाधिक जागा हव्या आहेत. पण राष्ट्रवादीकडे खासदारांचं बळ फारसं नसल्यानं जागावाटपाच्या चर्चेत त्यांचा दावा प्रबळ नसल्याचं भाजप नेत्यानं सांगितलं.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं राज्यात ४ जागा जिंकल्या होत्या. या चारपैकी केवळ एक खासदार अजित पवारांसोबत आहे.
राष्ट्रवादीनं बारामती, शिरुर आणि रायगडच्या जागांवर निवडणूक लढवावी, असा भाजपचा आग्रह आहे. गेल्या निवडणुकीत
या तीन जागांसह साताऱ्याची जागा राष्ट्रवादीनं जिंकली होती. पण आता ही जागा लढवण्यास भाजप उत्सुक आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या उदयनराजेंना इथून तिकीट दिलं जाऊ शकतं.
राष्ट्रवादीला परभणी, उस्मानाबादची जागादेखील आहे. दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. इथले विद्यमान खासदार उद्धव ठाकरेंसोबत
आजही एकनिष्ठ आहेत. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता. आता शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादीनं या जागांवर दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ मध्ये फूट पडली. अजित पवारांसह ४० आमदार भाजपसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं.
महायुतीत सहभागी होत असताना भाजपनं लोकसभेच्या ९ आणि विधानसभेच्या ९० जागा देण्याचा शब्द दिला होता. पण आता भाजप शब्द फिरवत असल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यानं अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली.
दिल्लीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीतही जागावाटपावर अंतिम तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.
दिल्लीत येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक होईल अशी माहिती आहे. भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ जागा लढवलेल्या होत्या.
यावेळी भाजपचा ३२ ते ३५ जागा लढवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची चिंता वाढली आहे.
भाजप लोकसभेच्या जागा वाटपात ३२ ते ३५ जागा लढवून मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना मोजक्या जागा सोडण्याची शक्यता आहे.
यावरुन जागा वाटपाची चर्चा अडलेय. अमित शाह यांनी शिंदे आणि पवारांना जिंकू शकणाऱ्या जागा देऊ असं म्हटलं होतं.
भाजपच्या या भूमिकेमुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नेत्यांच्या नाराजीची भीती आणि सोबत आलेल्या काही नेत्यांच्या घरवापसीची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या काही उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या पर्यायाचा विचार समोर आल्यानं शिवसेना
आणि राष्ट्रवादीच्या केडरमध्ये अस्वस्थता आहे. आपण आपल्या पक्षाच्या चिन्हावर जिंकू शकत नाही तर भाजपच्या चिन्हावर कसा विजयी होईल अशी चर्चा सेना राष्ट्रवादीच्या संघटनेत आहे.
महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळं भाजपच्या मित्रपक्ष चर्चेबाहेर आहेत.
मागील वेळेप्रमाणं यावेळी देखील महायुतीतील छोट्या मित्रपक्षांना काही हाती न लागण्याची चिन्ह आहेत. रामदास आठवले दोन,
नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष एक आणि महादेव जानकर यांच्या रासपनं एक जागा मिळावी, अशी अपेक्षा केलेली आहे.