राज ठाकरे -अमित शाहांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा विषय
Uddhav Thackeray topic in Raj Thackeray-Amit Shah meeting

राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेते अमित शहांची भेट घेतली आणि मनसेच्या महायुतीसोबत जाण्याचं जवळपास निश्चितच झाल्याचं बोललं जात आहे.
फक्त घोडं अडलंय ते जागावाटपावरुन. मनसेनं दोन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला होता. पण दोन जागा देणं शक्य नाही,
केवळ एकच जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी भेटीदरम्यान राज ठाकरेंना स्पष्ट सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
आता मनसे अध्यक्ष अमित शहांसोबतच्या बैठकीवर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट झाली खरी, पण या भेटीत उद्धव ठाकरेंबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सुपुत्र अमित ठाकरेही उपस्थित होते. तर अमित शाह यांच्यासह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा,
राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीत उद्धव ठाकरेंचाही विषय झाला.
राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं.
तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असं अमित शाह म्हणाले. विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप,
तेव्हाच ठरवू असं शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको
आणि म्हणूनच आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू, अशी स्पष्ट भूमिका अमित शाहांनी मांडली असल्याचं कळत आहे.
उद्धव ठाकरे हे महायुतीतील भाजपचे जुने साथीदार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सख्ये चुलत बंधू. 2019 च्या निवडणुकांनंतर चित्र पालटलं आणि भाजप शिवसेनेचा काडीमोड झाला आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस,
राष्ट्रवादीला साथ देण्याचं ठरवलं. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच राज्यानं अभूतपूर्व राजकीय भूकंप अनुभवला.
आजपर्यंत राज्याच्या सत्तानाट्यात दररोज म्हटलं तरी नवनवे अंक पाहायला मिळतायत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नवा डाव टाकत मनसेला युतीची ऑफर देऊ केली आहे.
उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट मोडण्यासाठीच भाजपनं राज ठाकरेंची साथ घेण्याचं ठरवल्याचं बोललं जात आहे. अशातच येत्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.