पुढील ४८ तासांत अवकाळी,गारपिट ; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
In the next 48 hours, unseasonal, hail; Alert to 'these' districts

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही राज्यांमध्ये उन्हाच्या झळा, तर काही भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे.
अशातच येत्या २६ मार्च रोजी पश्चिम हिमाचल प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात जोरदार वारे वाहू शकतात.
परिणामी हवामानात मोठा बदल होऊन येत्या ४८ तासांत बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजधानी दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये देखील या काळात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारपासून हवामानाची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २८ मार्चला हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मात्र, आता राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे.
होळीनंतर राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई पुण्यासह ठाणे शहरात उन्हाचा कडाका वाढणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. अशातच उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ व अं. से. वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला:
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक २२ ते २८ मार्च पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
संदेश :
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, फळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळबागेत फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.
सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे,
डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या डाळींब रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणी न केलेल्या
व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या चिकू रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे,
उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. सध्याच्या उष्ण वातावरणामूळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.
सामुदायिक विज्ञान
स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट, आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात.
पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरील तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत. हे रंग कमी खर्चात तयार करता येतात आणि या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक ही अत्यल्प असून निव्वळ नफा भरपूर आहे.