राज्यात मुसळधार ? हवामान विभागाकडून “या” जिल्ह्यांना अलर्ट
Majority in the state? Alert to "these" districts from Meteorological Department

राज्यात मराठावाडा आणि विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार सरी बरसत आहेत. यामुळे या भागांतील नद्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहणार आहे.
येत्या १२ तासांत पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे.
यामुळे आयएमडीकडून पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा काही भागात पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. येत्या २४ तासांत या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला येथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला मुसळधार पाऊस पडणार आहे.
परभणी जिल्ह्यात 36 तासांपासून जास्त पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील 50 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
तसेच दोन दिवसांपासून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे.
या पुरामुळे पैनगंगा नदीवरील किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. यंदा सहस्त्रकुंड धबधब्याचे रुद्र रूप प्रथमच पाहायला मिळत आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही तासांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर, बर्दापूर महामार्गावरील रेना नदीला पूर आला आहे. घाटनांदुरवरून रेणापूर आणि लातूर या दोन शहरांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.
मात्र रेना नदीला आलेल्या पाण्यामुळे या दोन शहरांसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रेना नदीचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतही घुसले आहे. त्यामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.