दक्षिण आफ्रिकाघालणार वर्ल्ड कप फायनलवर बहिष्कार
South Africa will boycott the World Cup final

दक्षिण आफ्रिका संघ खरेच चोकर्स आहेत. मोक्याच्या क्षणी हा संघ कच खातो. या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर तीन विकेटनी मात केली. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये साखळीत अनेक वेळा साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडूनही दक्षिण आफ्रिका संघ टीकेचा धनी ठरला आहे.
त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक आणि खेळाडू नाराज आहेत. आता दक्षिण आफ्रिका संघ १९ नोव्हेंबरला रंगणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या फायनलकडे पाठ फिरवणार आहे.
याबाबतची घोषणा दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी शुक्रवारी केली. ते स्वत: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारी अंतिम लढत बघणार नाही.
या मैदानावर सलग दहा लढती जिंकणारा भारत आणि सलग आठ लढती जिंकणारा ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने येणार आहे. साखळीत भारताने दक्षिण आफ्रिकेला सहज लोळविले होते,
तर साखळीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. मात्र, उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशा केली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला २१२ धावाच करता आल्या.
ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य ४७.२ षटकांत पूर्ण केले. यानंतर वॉल्टर म्हणाले, “प्रामाणिकपणे सांगू तर, मी फायनल बघण्याची शक्यता नाही. खरे सांगू तर फायनलमध्ये काय होते,
याच्याशी मला काही देणेघेणेच नाही.” वॉल्टर यांच्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचे चाहतेही या फायनलवर बहिष्कार टाकणार असल्याचे समोर येत आहे.
वॉल्टर यांना हा वर्ल्ड कप भारताने जिंकावा असे वाटते आहे. ते म्हणाले, ‘वर्ल्ड कप भारतात होत आहे. तेव्हा यजमान देशाने वर्ल्ड कप जिंकावा, असे वाटते. अर्थात, ऑस्ट्रेलियाच्या गोटात आता माझे अनेक मित्र झाले आहेत.
खासकरून प्रशिक्षक वर्गात. तेव्हा त्यांच्यासाठी एक कोपरा हळवा नक्कीच आहे. मात्र, भारतात आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा संघ सर्वोत्तम आहे. ते सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहेत, तेव्हा भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा.’
या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमावर जोरदार टीका झाली. नेतृत्वहीन कर्णधार म्हणून त्याला हिणवले गेले. मात्र, तरीही वॉल्टर यांनी बवुमाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे बवुमाचे कर्णधारपद जाईल, असे चित्र तरी सध्या नाही.