बॉलिवूड अभिनेता सलमानखानच्या भेटीनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री ?
What did the Chief Minister say after meeting Bollywood actor Salman Khan?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर राज्यासह देशात एकच खळबळ उडाली आहे.
अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सलमानच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असं आश्वासनही दिलं आहे.
सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना फोन करून सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते.
शिवाय घटनेच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी फोन करून सलमानची चौकशीही केली होती. दरम्यान, एका फेसबुक अकाउंटवरून एका व्यक्तीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचं समोर आलं होतं.
तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासादरम्यान, गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे बिश्नोई गँगचे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी बिश्नोई गँगला थेट इशाराच दिला आहे.
सलमानच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही गँग नसून पूर्ण अंडरवर्ल्ड संपलं आहे.
आम्ही बिश्नोईला खतम करू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, अशी कारवाई करू असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच इथे मुंबई पोलिस आहेत. हा महाराष्ट्र आहे. इथे कुणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही.
सलमान खान तर आमचा खूप मोठा फिल्मस्टार आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आमची आहे. अशी कुणाचीही गँग इथे चालणार नाही. ज्यांना पकडलंय त्यांचा तपास सुरू आहे.
मळापर्यंत तपास होईल. आरोपींवर कारवाई केली जाईल. नागरिकांची सुरक्षा करणं हे आमचं काम असून, आम्ही ते काम करणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सलमानच्या घरी भेट दिली होती.
अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटद्वारे एका व्यक्तीने सलमानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या फेसबुक पोस्टद्वारे सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली होती.