AIMIM सोलापुर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार नाही;कोणाला होणार फायदा?
AMIM will not field a candidate in Solapur Lok Sabha constituency; who will benefit?
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याठी दंड थोपटणाऱ्या ‘एमआयएम’ने अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या निर्णयानंतर सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ‘एमआयएम’ने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून घेतलेली माघार कोणाच्या पथ्यावर याची चर्चा सुरू आहे.
धर्मनिरपेक्ष मतांचे होणारे विभाजन टळल्याने काँग्रेसच्या दृष्टीने एमआयएमची भूमिका फायदेशीर ठरणार आहे, तर भाजपच्या आशांना सुरुंग लागला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानंतर एमआयएने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा न करण्याची घोषणा केली आहे. संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,
संविधान वाचवणाऱ्या पार्टीला त्यामुळे येत्या काळात समर्थन देण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापुरात एमआयएमचा अप्रत्यक्षपणे हा काँग्रेसला पाठिंबा असल्याचे मानले जाते.
मागच्या काही दिवसांपासून एमआयएम सोलापुरात उमेदवार उत्तरवण्याच्या तयारीत होती, त्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली होती.
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी एमआयएमच्या स्थानिक नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती.
त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे वाटत असतानाच रमेश कदम यांनीच काही दिवसांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत दिले होते.
रमेश कदम यांच्या संकेतानंतर एमआयएमने गुरुवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली.
त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. संविधान वाचविणाऱ्या पार्टीला येत्या काळात आपला पक्ष पाठिंबा देईल, असेही एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितले.
मागील निवडणुकीत वंचित-एमआयएम युतीचा काँग्रेसला फटका बसला होता. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून जयसिद्धेश्वर महास्वामी
आणि वंचित बहुजन आघाडीकडून खुद्द ॲड. प्रकाश आंबेडकर हे उतरले होते. त्या निवडणुकीत ॲड. आंबेडकर यांनी एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकवर होते. मात्र, शिंदे यांच्या विजयाचे गणित आंबेडकर यांच्यामुळे बिघडले होते.
सुशीलकुमार शिंदे यांचा मागील निवडणुकीत एक लाख ५८ हजार ६०८ मतांनी पराभव झाला हेाता. त्यामुळे आंबेडकर यांनी घेतलेली एक लाख ७० हजार मते हीच शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा वंचित आणि एमआयएम फॅक्टर काँग्रेसचे गणित बिघडवेल, अशी भाजपला आशा होती.
मात्र, वंचितकडूनही तेवढा तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरलेले नाही, तर एमआयएमने तर निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे एमआयएमची भूमिका कोणाच्या पथ्यावर याची चर्चा आहे.