निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सुप्रिया सुळेंच्या अडचणीत वाढ
Supriya Sule's problems increased due to the Election Commission's decision

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारांना निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आली. या चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाने
ती फेटाळून लावली आहे. अपक्ष उमेदवार शेख यांचे तुतारी (ट्रम्पेट) हे चिन्ह निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कायम ठेवला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणूक लढवण्यासाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
या अर्जांची 20 एप्रिलला छाननी झाली. त्यामध्ये पाच अर्ज बाद करण्यात आले. तर 46 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी
आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत. या 38 उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.
बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमात ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे चिन्ह त्यांना देण्यात आले आहे.
मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तुतारी फुकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने तुतारी हे चिन्ह
दुसऱ्या उमेदवारास दिल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सांगत यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आला होता.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बारामती लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर तुतारी वाजणार माणूस हे चिन्ह सुप्रिया सुळे यांचे असणार आहे,
तर शेख यांना तुतारी (ट्रम्पेट) हे चिन्ह उमेदवाराला कायम ठेवले आहे. दरम्यान, हा अपक्ष उमेदवार 32 व्या क्रमांकावर असल्याने थेट त्याचा मतदानावर प्रभाव पडणार नसल्याचे देखील बोलले जात आहे.
तुतारी वाजविणारा माणूस आणि तुतारी यांच्या नावात साधर्म्य असल्याचा हा आक्षेप नोंदवला होता. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी हा आक्षेप फेटाळून लावला आहे.