फुकट्या प्रवाश्यामुळे रेल्वेची दिवाळी झाली मालामाल
Due to free passengers, the railways got rich on Diwali

दिवाळीच्या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने मोठा दणका दिला आहे. गेल्या १६ दिवसांत रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
त्यामुळे रेल्वेचा मोठा फायदा झाला असून फुकट्या प्रवाशांचे खिसे रिकामे झाले आहेत. रेल्वेच्या या विशेष कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दिवाळीत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. हीच बाब लक्षात घेता रेल्वेने दिवाळीसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या होत्या. मात्र, तरीही गर्दीचा फायदा घेत अनेकांनी विनातिकीट प्रवास केला.
पण, फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच विशेष पथक आणि तिकीट तपासणीस (टीसी) यांची नेमणूक केली होती.
या पथकाने दिवाळीच्या अगोदर व दिवाळीतील काही दिवस अशा १६ दिवसांमध्ये तब्बल २२ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांना पकडले.
या सर्व प्रवाशांकडून पथकाने नियमानुसार दंड वसूल केला. त्यानुसार एकट्या पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे पथकाच्या या कारवाईमुळे रेल्वेची दिवाळी झाली असून खिसा रिकामा झाल्याने फुकट्या प्रवाशांचं मात्र दिवाळं निघालं आहे.
याबाबत पुणे रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी सांगितले, की दिवाळीमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती.
काही प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचे रेल्वेच्या निदर्शनास आले. रेल्वे प्रशासनाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत २२ हजारांहून अधिक प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले.
त्यांच्याकडून १ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर योग्य तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून ३५ लाखांचा तर बेकायदा सामनांची वाहतूक करणाऱ्यांकडून जवळपास १ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.