सरकारने कोरोना लसीवरून मोदींचा फोटो हटवला
Government removed Modi's photo from corona vaccine

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोविशिल्डचे काही दुष्परिणाम असल्याचं समोर आलं आहे. यामुळे मोठा वाद देखील निर्माण झाला आहे.
त्यातच भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. कोविड-१९ लसीच्या सर्टिफिकेटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यात आला आहे.
देशात मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झालं आहे. या सगळ्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं जातं. भाजप नेत्यांनी याचा जोरदार प्रचार केला होता.
मात्र, कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने यूकेच्या कोर्टामध्ये दुष्परिणामांबाबत कबुली दिली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे मोठं पाऊल उचलल्याची चर्चा सुरु आहे.
कोविशिल्ड लस घेतल्याने थ्रोम्बोसिससोबत थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) होतो असं कंपनीने कबुलं केलं आहे. अनेक भारतीय लोकांनी आपलं कोरोना सर्टिफिकेट तपासलं
असता त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटा दिसला नाही. याठिकाणी क्यूआर कोड दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने हा फोटो हटवला असल्याचं स्पष्ट आहे. द हिंदूने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय की, सध्या लोकसभा निवडणुका सुरु असल्याने आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सर्टिफिकेटवरुन हटवण्यात आला आहे. ‘द प्रिंट’ला आरोग्य मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांचा फोटो सर्टिफिकेटवरुन हटवण्यात आल्याची ही पहिली वेळ नाही. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा येथे निवडणुकीच्या दरम्यान
मोदींचा फोटो सर्टिफिकेटवरुन काढण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. पण, सध्याच्या या घटनेला एस्ट्राजेनेका कंपनीने दिलेल्या कबुलीसोबत जोडून पाहिलं जात आहे.