मोदींच्या सभेपूर्वी आंदोलन करणाऱ्यांना अटक
Agitators arrested before Modi's meeting

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज पिंपळगाव येथे सभा पार पडणार आहे.
मात्र, या सभेपूर्वीच शेतकरी संघटनेच्या लोकांनी लासलगाव येथे कांद्याच्या माळा गळ्यात घालून निर्यातबंदी मागे घ्या, अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनेतील या लोकांसह १४ ते १५ जणांना लासलगाव पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहे. तर पुढील कारवाई सुरु आहे.
कांदा निर्यात रोखल्याने लासलगाव येथील शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात मोठे आंदोलन उभारले होते. केंद्र सरकाराच्या विरोधात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील रोष होता.
याची दखल घेत केंद्र सरकारने ऐन निवडणुकीच्या काळात कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. तरीही कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांचे या निर्णयावर समाधान झाल्याचे चित्र दिसत नाही.
लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, डॉ. सुजित गुंजाळ, शिवा सुराशे, डॉ. विकास चांदर, विकास रायते, महेश होळकर, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, भरत होळकर,
राहुल शेजवळ, मयूर बोरा यांच्यासह आणखी दहा जणांना लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे
व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब खंडाळ, पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेपर्यंत या लोकांना पोलीस ठाण्यातच ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच लासलगाव पोलिसांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या
शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्याची माहिती देखील समोर आली आहे.