मुख्यमंत्र्यांच्याच भावाचे नाव मतदार यादीतून गायब ,मतदान न करता परत जावे लागले
The name of the Chief Minister's brother disappeared from the voter list, he had to go back without voting
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, धुळे आणि दिंडोरी मध्ये मतदान पार पडलं.
मुंबईत काही ठिकाणी संथ गतीने मतदान होत असल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी सुरळीत मतदान पार पडले. महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले आहे.
अनेक ठिकाणी मतदारांची नावेच नसल्याच्या तक्रारी देखील पुढे आल्या. त्यामुळे देखील मतदार नाराज झाले.कडक उन्हामुळे अनेक जण दुपारनंतरच मतदानाला बाहेर पडले. अनेकांनी सकाळी लवकर मतदान उरकुन घेतले.
दुसरीकडे पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सात जागांवर देखील सोमवारी मतदान झाले. पण पश्चिम बंगालमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावालाच मतदान करता आले नाही.
ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ बबून बॅनर्जी यांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
बबून हे हावडा शहरातील मतदार आहेत. ते आज जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले तेव्हा ते निराश झाले. कारण मतदार यादीत त्यांचे नाव आले नव्हते.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते शंतनू सेन म्हणाले की, “निवडणूक आयोग आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. हे का घडले हे नंतर पुढे येईल. बबून यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
टीएमसीकडून हावडा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रसून बॅनर्जी यांना पुन्हा तिकीट दिले होते. पण त्यांना उमेदवारी दिल्याने बबून यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी भावासोबतचे सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. टीएमसीने त्यांना हावडामधून तिकीट न दिल्याने ते अपक्ष निवडणूक लढवतील असे म्हटले जात होते.
पक्षाने आपल्याला तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर बबून हे भाजपमध्ये जाण्याच्या विचारात असल्याची देखील चर्चा रंगली होती.
पण त्यांनी तसे केले नाही. बबून हे बंगाल ऑलिम्पिक असोसिएशन आणि बंगाल हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव आणि टीएमसीच्या क्रीडा शाखेचे प्रभारी देखील आहेत.