हवामान विभागाचा अलर्ट; पाच दिवस अवकाळीबरोबरच उष्णतेची लाट
Meteorological department alert; Five days of unseasonably hot weather

राज्यात वाढत्या उकाड्यामुळे मान्सून लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राज्यात उन्हाचा तडाका वाढतोय. तर दुसरीकडे मान्सून आगेकूच करतोय.
9 तारखेला अंदमानात दाखल झालेला मान्सून आता 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता आहे.
तर 15 जूनपर्यंत मान्सूनचं नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा विदर्भात आगमन होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मान्सून अगोदर काही दिवसात उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे..
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रीवादळ धडकलंय. परिणामी महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या लाटा उसळत आहे. . अनेक भागांमध्ये किनाऱ्यावर उंचच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे.मुंबईसह कोकण, खान्देश,
मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात अवकाळीबरोबरच 1 जूनपर्यंत उष्णतासदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त आहे. यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे, तर जळगावचा पारा 43 अंशांवर गेला आहे.
राज्यासह देशात तापमान चांगलेच वाढले आहे. देशात अनेक राज्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात 10 जूनच्या आसपास प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कोकणात आल्यनंतर 15 जून दरम्यान कोकणातून घाटमाथा ओलांडून खानदेश, , नाशिक, नगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर,
सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 20 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर पसरण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागारात तयार झालेल्या रेमल महाचक्रीवादळाचा वेग 130 किमीपेक्षा पुढे जाणार आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळून वादळ आज बांगलादेशकडे जाणार आहे.
जोरदार हवा आणि पाऊस सुरु झालाय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पश्चिम बंगाल, ओडिशात एनडीआरएफची टीम दाखल झालीय. रेमल वादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल,
ओडिशात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय, तर आजूबाजूच्या दहा राज्यांना पावसाचा इशाराही देण्यात आलाय. तर कोलकातामध्ये
मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोलकातामधील विमान सेवा काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मे दरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी ते सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी ते सरासरीएवढे राहण्याची व 31 मे ते 06 जून दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 मे ते 04 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी.
जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. अडसाली ऊस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी.
पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्षिक तणे असू नयेत. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी. अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन निवडू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.
डाळींब लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.
चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.
भाजीपाला
खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.
चारा पिके
खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.
तुती रेशीम उद्योग
पलटी नांगराच्या साहाय्याने जमिनीची नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी. जमिन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन/हे. शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी द्यावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन/हे. म्हणजे दोन टन/एकर दोन समान हप्त्यात द्यावे. तूती लागवडीसाठी तूती रोप वाटीका 3 आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन महिने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोप वाटीका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात रोपे लागवड करावी. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तूती लागवड करता येते.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
दोन टक्के आवळयाच्या पानाच्या अर्काचा वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ प्रतिबंघित करता येते. आवळयाच्या पानाच्या अर्कासह 6 % सीट्रिक ॲसिड घेऊन सुती कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सुक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा प्रतिबंध कापडाच्या पाच धुण्यानंतर कमी झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्टयपूर्ण कपडयांना उदा. अवगुंठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पटृटया यावर केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.
कृषि अभियांत्रिकी
शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल. ज्या भागात मागील वर्षी शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव आढळून आला होता अशा ठिकाणी शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील.