2009, 2014,2019 लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल किती खरे ठरले
2009, How true were the exit polls of 2014,2019 Lok Sabha elections?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज (१ जून) संपणार आहे. मतदानानंतर लगेचच एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील.
भारतात 1957 सालापासून म्हणजेच दुसऱ्या लोकसभा निवडणुकीपासून एक्झिट पोल सुरू झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने पहिल्यांदाच सर्वेक्षण केले.
तेव्हापासून जवळपास प्रत्येक निवडणुकीत एक्झिट पोल घेतले जातात. तथापि, कधी कधी एक्झिट पोलचे निकाल अगदी अचूक असतात तर कधी प्रत्यक्ष निकालांच्या अगदी विरुद्ध असतात.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, शेवटचे मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोलचे निकाल प्रसारित केले जाऊ शकतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील निवडणुकांदरम्यान एक्झिट पोल दाखवले जात होते.
यानंतर निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे पोहोचल्या. त्यानंतर आयोगाने नियम कडक केले
आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली की एक्झिट पोलचे प्रसारण शेवटच्या टप्प्यानंतरच होईल, मग ती लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक असेल.
सर्व देशाच्या नजरा एक्झिट पोलकडे लागल्या आहेत. पुढील दोन दिवस सर्वत्र एक्झिट पोलच्या अंदाजाची चर्चा असणार आहे. ४ जून रोजी अंतिम निकाल जाहीर होतील.
पण त्यापूर्वी एक्झिट पोलचे निष्कर्ष काय आहेत? याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर मागील लोकसभा निवडणुकींच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवर आणि एक्झिट पोलचा अंदाज किती अचूक होता, यावर एक नजर टाकूया
२०१४ आणि २०१९ या दोन सार्वत्रिक निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुका ७ एप्रिल ते १२ मे दरम्यान झाल्या होत्या,
ज्याचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाला होता. तर, २०१९ च्या निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत झाल्या होत्या आणि याचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
२०१४ मध्ये, सरासरी आठ एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २८३ जागा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला १०५ जागा मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
त्या वर्षी ‘मोदी लाट’ किती असेल याचा अंदाज लावता आला नाही; ज्यामुळे एक्झिट पोल आणि निकालाच्या आकडेवारीत बरेच अंतर होते.
२०१४ च्या निवडणुकीत एनडीएला ३३६ जागा मिळाल्या आणि यूपीएला केवळ ६० जागा मिळाल्या. यापैकी भाजपाला २८२, तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या.
२०१९ मध्ये, सरासरी १३ एक्झिट पोलने एनडीएची एकत्रित संख्या ३०६ आणि यूपीएची एकत्रित संख्या १२० असेल, असा अंदाज वर्तवला होता. हादेखील अंदाज अचूक नव्हता.
कारण २०१९ च्या निवडणुकीत एनडीएने एकूण ३५३ जागा जिंकल्या, तर यूपीएने ९३ जागा जिंकल्या. त्यापैकी भाजपाला ३०३ आणि काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या.
२००९ मध्ये यूपीए पुन्हा सत्तेत आले होते. त्यावेळी सरासरी चार एक्झिट पोलने यूपीएच्या संख्येला कमी लेखले होते. त्यांनी यूपीएला १९५ आणि एनडीएला १८५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.
परंतु, त्या निवडणुकीत यूपीएला २६२ जागा, तर एनडीएला १५८ जागा मिळाल्या होत्या. यापैकी काँग्रेसने २०६ जागा आणि भाजपाने ११६ जागा जिंकल्या होत्या.