मोदींना गेली दहा वर्ष सभागृहात साथ दिली, मात्र आता या पक्षाचा मोदी विरोधात आक्रमक पवित्रा
Modi has been supported in the House for the last ten years, but now this party is taking an aggressive stance against Modi
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारविरोधात आघाडी उघडली आहे.
आम्ही मजबूक आणि जिवंत विरोधी पक्ष आहोत, अशी भूमिका बीजू जनता दलानं घेतली आहे. कोणत्याही विषयावर केंद्र सरकारला पाठिंबा देणार नाही आणि ओडिशाच्या हितासाठी संसदेत आवाज उठवू, असा आक्रमक पवित्रा बीजेडीनं घेतला आहे.
बीजेडीनं गेल्या १० वर्षांमध्ये मोदी सरकारला बरीच मदत केली. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर त्यांनी सरकारला सहकार्य केलं.
राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्यानं बीजेडीनं त्यांना कायम मदतीचा हात दिला. बीजेडीच्या सहकार्यामुळेच राज्यसभेत सरकारला अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात यश आलं.
पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओडिशात भाजपनं बीजेडीचा पराभव केला. त्यामुळे तब्बल २४ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नवीन पटनायक यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर बीजेडीनं भाजपला आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे.
माजी मुख्यमंत्री पटनायक यांनी सोमवारी भुवनेश्वरमध्ये राज्यसभेच्या नऊ खासदारांची बैठक घेतली. केंद्र सरकारला राज्यसभेत घेरण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली.
राज्याचा विकास आणि ओडिशातील नागरिकांचं कल्याण या दोन गोष्टींवर भर द्या. आपल्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील ४.५ कोटी लोकांचा आवाज व्हा आणि संसदेत बाजू मांडा, अशा सूचना पटनायक यांनी केल्या.
बीजेडीनं घेतलेली आक्रमक भूमिका भाजपसाठी धक्का मानला जात आहे. गेल्या १० वर्षांत बीजेडी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसनं राज्यसभेत भाजपला साथ दिली.
२००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अश्विनी वैष्णव (विद्यमान रेल्वेमंत्री) यांना निवडून आणण्यात बीजेडीची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यात, मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव हाणून पाडण्यात, ट्रिपल तलाक या सगळ्यांमध्ये बीजेडीनं भाजपला सहकार्य केलं.