ट्रम्प यांच्यावरील हल्ला पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ?

Attack on Trump due to police laxity?

 

 

 

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सल्व्हेनिया येथे शनिवारी (१३ जुलै) गोळीबार झाला. या गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी हल्लेखोराला ठार केलं आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेला संबोधित करत असाताना हा हल्लेखोर जवळच्याच एका इमारतीच्या छतावर रायफल घेऊन बसला होता. ट्रम्प भाषण करत असतानाच गोळीबाराचा आवाज आला

 

आणि त्याच वेळी ट्रम्प खाली कोसळले. एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. ट्रम्प यांच्या उजव्या कानातून रक्तस्राव होऊ लागला. ट्रम्प यांचे अंगरक्षक आणि सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तत्काळ ट्रम्प यांना घेराव घातला.

 

तसेच त्यांना व्यासपीठाच्या मागील सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. दरम्यान, सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी हल्लेखोराचा शोध घेऊन त्याला ठार केलं आहे.

 

ज्या इमारतीच्या छतावर शूटर होता तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना शूटरबद्दलची माहिती दिली होती. पोलिसांना सांगूनही त्यांनी ट्रम्प यांना व्यासपीठावरून खाली उतरवलं नाही, असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

 

प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं की “प्रचारसभेच्या ठिकाणाच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या छतावर आम्ही एका रायफलधारी व्यक्तीला पाहिलं.

 

ती व्यक्ती रांगत पुढे सरकत होती. तो इसम बराच वेळ छतावर होता. त्यानंतर आम्ही याबाबत पोलिसांना कळवलं. मात्र पोलिसांना माहिती दिल्यानंतर बराच वेळ ट्रम्प यांचं भाषण चालू होतं.

 

त्यावेळी आम्हाला प्रश्न पडला की पोलिसांनी ट्रम्प यांना अजून व्यासपीठावरून खाली का उतरवलं नाही? तसेच पोलिसांनी अद्याप त्या रायफलधारी माणसाला का पकडलं नाही? तेवढ्यात आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला आणि ट्रम्प जमिनीवर कोसळले.”

 

प्रत्यक्षदर्शी व्यक्ती म्हणाली, “मी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सिक्रेट सर्व्हिसचे जवान छताकडे पाहत होते. तेव्हा मी त्यांना हाताने इशारा करून त्या छताकडे पाहण्याचा (जिथे रायफलधारी इसम बसला होता) इशारा करत होतो.

 

मात्र सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी कारवाई करायच्या आधीच ट्रम्प जमिनीवर कोसळले होते. सभेच्या आसपास ज्या इमारती आहेत,

 

सभेपूर्वी त्या इमारतींच्या छतांवर टेहळणी का केली गेली नाही? सपूर्ण परिसरात तपास केला होता का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.”

 

दरम्यान, एका स्थानिकाने सांगितलं की हल्लेखोर मैदानाच्या बाजूला असलेल्या इमारतीवर होता, तो तिथे कसा पोहोचला हे शोधून काढावं लागेल. फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

 

या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून त्यांनी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानले आहेत. सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी हल्ल्यानंतर तत्काळ पावलं उचलत ट्रम्प यांना सुरक्षित केल्याने पुढील अनर्थ टळला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *