काँग्रेस म्हणते अर्थसंकल्पात काँग्रेसच्याच जाहीरनाम्यातील गोष्टी घेतल्या
Congress says that the budget has taken things from the manifesto of the Congress itself

महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त कराच्या रूपातून पैसा केंद्र सरकारला जात असताना त्याचा परतावा मात्र होताना दिसत नाही.
केंद्र सरकारनेआपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून तरतूद केली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या उपकारांची परतफेड करताना महाराष्ट्रासारख्या राज्यांकडे मात्र पाठ फिरवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे एनडीएतील महत्त्व कमी झाले, त्यांची दखल घेतली जात नाही हे यावरून स्पष्ट होतं, असेही आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे बोलले जात आहे.
अशातच हा अर्थसंकल्प सादर होताच राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
असे असताना या बजेटने महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पाने पुसली, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी यांनी केली आहे.
महिला आणि मुलींसाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा केवळ आभासी घोषणा केल्या आहेत. तरुणांना केवळ एक वर्षासाठी इंटर्नशिपचे गाजर दिले आहे.
याने मूळ बेरोजगारीची समस्या कमी होणार नाही. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही गोष्टी उचलल्या असल्याचे दिसते,
मात्र काँग्रेसची विकासाची दृष्टी ही घेतली असती तर बरं झालं असतं. असा टोलाही आमदार यशोमती ठाकूर यांनी लगावला.