आमदारकीची शपथ घेताच पहिली टीका शरद पवारांवर

The first criticism on Sharad Pawar as soon as he took the oath of MLA

 

 

 

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाची रविवारी दुपारी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खोत यांना सदस्यत्वाची शपथ दिली.

 

शपथ घेतल्याबरोबर सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कामाला सुरूवात केली असून मराठा आरक्षण मुद्द्यांवरून त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

 

शरद पवार यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भुषविले, पण त्यांनी मराठा समाजाची माती केली, अशा शब्दात सदाभाऊंनी पवार यांना लक्ष्य केले.

 

महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित ११ आमदारांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

 

शपथेनंतर सदाभाऊ खोत यांनी राजकारणातील आतापर्यंतचा प्रवास माध्यमांशी बोलताना उलगडून सांगितला. शेतीच्या बांधावरून थेट विधान भवनाच्या बांधावर आलो.

 

त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खोत यांनी आभार मानले. तसेच माझ्या पदाचा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याठी वापर करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

त्याचवेळी मराहाराष्ट्रात धुमसत असलेल्या आरक्षण प्रश्नावरून त्यांनी शरद पवार यांना जबाबदार धरून मराठा समाजाची त्यांनी माती केल्याची बोचरी टीका केली.

 

महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनीच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या उत्थानासाठी कार्य केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

 

मराठा समाजातील मुलांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल किंवा सारथीसाठी संस्था उभा करण्याचे भरीव काम फडणवीस यांनी केले.

 

त्याचवेळी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या पवार यांनी मराठा समाजासाठी भरीव काम न करता त्यांची माती कशी होईल हेच पाहिजे, अशी टीका खोत यांनी केली.

 

मराठा-ओबीसी यांच्यातील वैर संपवून आता दोन्ही समाज गावगाड्यात पहिल्यासारखे गुण्या गोविंदाने राहिले पाहिजेत, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. राजकारण करताना याचे भान ठेवले पाहिजे, असे खोत पवार यांना उद्देशून म्हणाले.

 

मी शेकडो वेळा शेतकऱ्यांसाठी ऊस, सोयाबीन, कापूस यासंदर्भाने आंदोलने केली. त्यासाठी येरवाडा, कळवा जेलमध्ये गेलो. पण आंदोलने करताना ते थांबवायचे कुठे हे ज्याला समजलं त्याचे आंदोलन यशस्वी होते

 

आणि ज्यांच्यासाठी आंदोलन केले, त्यांनाही न्याय मिळतो, असा उपरोधिक सल्ला खोत यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे जरांगे पाटील यांना दिला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *