पावसाचा हाहाकार; वायनाडमध्ये भूस्खलनाच्या घटनेत ९३ जणांचा मृत्यू; १२८ जखमी
Havoc of rain; 93 killed in landslides in Wayanad; 128 injured
केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत ९३ लोकांचा मृत्यू झाला असून १२८ जण जखमी झाले आहेत. तसेच अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. भूस्खलनाच्या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र, मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे बचावकार्य करण्यास अडथळे येत आहे.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली आहे.
केरळमध्येही पावसाने थैमान घातले असून मेप्पाडीच्या डोंगराळ भागात मंगळवारी (३० जुलै) पहाटे भूस्खलनाची घटना घ़डली.
या घटनेनंतर तातडीने एनडीआरएफच्या टीम आणि स्थानिक प्रशासनाने दाखल होत मदतकार्य सुरु केलं. यामध्ये अनेक लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर त्या ठिकाणी बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम आणि भारतीय लष्करालाही प्राचारण करण्यात आलं आहे.
तसेच एमआय-१७ आणि एएलएच (ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर) हे दोन हवाई दलाचे हेलिकॉप्टरही दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चूरलमला, अट्टामला नूलपुझा, मुंडक्काई ही गावे जास्त प्रमाणात प्रभावित झाले आहेत.
दरम्यान, वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली असून केरळ सरकारला संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत केंद्र सरकार करेल,
असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना दिलं आहे. तसेच या भूस्खलनाच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या
कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबाबत ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
आणि काँग्रेसचे नेत्या प्रियांका गांधी या वायनाडमधील भूस्खलनाची घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच तेथील ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत, अशी माहिती सांगण्यात येत आहे.
भूस्खलन म्हणजे जमीन खचणे आणि खडक व दरड कोसळणे. भूस्खलनाचा वेग कधी कमी, तर कधी जास्त असतो. भूस्खलनाचे वहन, स्खलन, खडक कोसळणे असे अनेक प्रकार आहेत.
युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (यूजीएसजी) नुसार, गुरुत्वाकर्षणाच्या थेट प्रभावाने माती आणि खडकांमध्ये हालचाल होते आणि ते उतार भागातून खाली सरकू लागतात.
भूस्खलनाच्या इतर प्रकारांमध्ये चिखलाचा प्रवाह (मडस्लाईड), चिखल आणि दगडाचा प्रवाह, मोठ्या प्रमाणात खडकांचा प्रवाह (रॉक फॉल) यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांनी ‘एक्स’वर चित्राच्या मदतीने भूस्खलनाच्या घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे.