मराठवाड्यात गुटख्याचा कारखाना ;साहित्य पाहून पोलिसही चक्रावले
Gutkha factory in Marathwada; The police were also confused after seeing the literature

खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक आयपीएस श्रीमती महल स्वामी यांनी
छापा घालून २५ लाख २१ हजार ४२५ मुद्देमाल जप्त केला आहे. खुलताबाद तालुक्यातील झालेली ही अलीकडची सर्वांत मोठी कारवाई आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर पोलिस दलाकडून अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर खुलताबादमध्ये अवैधरीत्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली.
खात्री करून पोलिस पथकाने बुधवारी खिर्डी येथील एका मंगल कार्यालयावर छापा मारला. त्या वेळी बनावट गुटख्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुगंधी सुपारी,
तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक, दोन टेम्पो वाहन असा एकूण २५ लाख २१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आयपीएस अधिकारी श्रीमती महल स्वामी यांनी खिर्डी रोडवरील या मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास छापा टाकला. या बनावट गुटखा निर्मितीच्या कारखान्यात रात्री उशिरापर्यंत साहित्य जमा करण्याची कारवाई सुरू होती.
यामध्ये विविध तंबाखू गुटखा निर्मितीसाठी लागणारे साहित्य मशिनरी, एक ट्रक, दोन टेम्पो भरून सर्व माल खुलताबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा ताराचंद रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महंमद रफीक महंमद झकेरिया (वय ५०), अनिसा बानो महंमद फरिद (वय ४८, रा. कटकट गेट, हत्तीसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर),
हुसेन महंमद सिद्दिकी झुडा (वय ४९), इरफान हारून तेली (वय ४५, दोघे रा. सेवा मंगल कार्यालय, खिर्डी, ता. खुलताबाद) या चौघांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपींनी संगनमत करून उपरोक्त महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूची चोरटी विक्री करण्यासाठी साठा केला आहे.
सुगंधित तंबाखू तयार करण्याच्या उद्देशाने कच्चे अन्नपदार्थ व पॅकिंग करता वापरल्यास येणारे साहित्य साठा केला आहे. सदरील प्रतिबंधित अन्नपदार्थांची चोरटी वाहतूक करण्याच्या उद्देशाने वाहने बाळगल्याचे निदर्शनास आले आहे.
अवैधरित्या आर्थिक फायदा मिळवण्याच्या दृष्टीने खाणाऱ्या व्यक्तीस गंभीर दुखापत होऊ शकते. याची जाणीव असूनसुद्धा कायद्यांद्वारे विक्रीसाठी व उत्पादनासाठी प्रतिबंधित केलेले व जनतेचे आरोग्यास अपायकारक असलेले
सुगंधित तंबाखू हा विक्री करता उत्पादन पॅकिंग व वाहतुकीच्या उद्देशाने साठा करून अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे पुढील तपास करीत आहेत.
गेल्या वर्षी या प्रकरणी एका स्थानिक पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला असता
‘त्या’ पत्रकाराच्या विरुद्ध खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र बुधवारी झालेल्या कारवाईत बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक आयपीएस महक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
या पोलिस कारवाईत पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे, पोलिस उपनिरीक्षक मनीषा जगताप, पोलिस हवालदार शिवनाथ सरवदे,
महिला पोलिस शिपाई सविता मोटे, शिपाई प्रशांत गीते, अमोल मोरे, मोना पवार, दिनेश गायकवाड, प्रल्हाद जटाळे, वाल्मीक बनगे, पवनसिंग सुंदरडे, योगेश कदम, राजाराम जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
खिर्डी येथील मंगल कार्यालयामध्ये बिनधास्त बनावट गुटखा तयार केला जात होता. तेथील बाहेरील आणि आतील रचना, साहित्य पाहून पोलिसही चक्रावले. तेथे गुटखा तयार करण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले.