पक्षांतर्गत असंतोष चव्हाट्यावर;अजितदादानि बोलावली मुंबईत महत्त्वाची बैठक

Dissatisfaction within the party is on the rise; Ajit Dadan called an important meeting in Mumbai

 

 

 

 

विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षांच्या नाराजीची तत्काळ दखल घेत सर्वांना मुंबईत चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. गणेशोत्सवानंतर ही बैठक होईल.

 

 

अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोमवारी बैठक झाली. यात स्वपक्षीय मंत्री आणि मित्रपक्षांकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गणेशोत्सवानंतर भेट घेण्याचा निर्णय घेतला. हा असंतोष चव्हाट्यावर येताच पक्षाचे कार्यालयीन सचिव शिवाजीराव गर्जे यांनी फोन करून नागपूर-विदर्भातील शहर, जिल्हाध्यक्षांना

 

मुंबईत आमंत्रित केले. अडचणी कोणत्या, मुद्दे आणि मागण्या काय, यावर सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना त्यांनी केली. बैठकीस अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

 

शहराध्यक्ष प्रशांत पवार व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या उपस्थितीत नागपुरात झालेल्या बैठकीस बहुतांश अध्यक्ष सहभागी झाले होते. तीन अध्यक्षांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भावना व्यक्त केल्या.

 

विदर्भात प्रफुल्ल पटेल, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राजेंद्र शिंगणे, इंद्रनील नाईक यांच्यासारखे बडे नेते विदर्भात असतानाही पक्षाला कोणत्याही समितीत अपेक्षित स्थान मिळालेले नाही.

 

पक्षाच्या कोट्यातील अनेक पदे रिक्त आहेत. मात्र, त्याचा कुठलाही विचार होत नाही. स्वपक्षीय मंत्री देखील जिल्हाध्यक्षांच्या निवेदनास केराची टोपली दाखवतात.

 

मित्रपक्षाचे पालकमंत्री पदाधिकाऱ्यांची दखल घेत नाही. जिल्हा नियोजन वा इतर समितीतून विकास कामांना निधी मिळत नाही.

 

लोकसभा व विधान परिषदेत विदर्भात एकही जागा न मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत. ही व्यथा पक्षाध्यक्षांच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष एकत्र आले. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

 

 

 

राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो. त्यामुळे या भागात योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाल्यास पुढील मार्ग सुकर होऊ शकतो.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सक्रिय व आक्रमक झाल्याने जागा वाटपाच्या वाटाघाटीत समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी आमदार असावा, अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. नागपूर ग्रामीणमध्ये असलेल्या दोन्ही जागा पक्षाने कायम ठेवाव्या व शहरात किमान एक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे,

 

अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. पश्चिम नागपूरवर इच्छुकांनी दावा केला आहे. यात शहराध्यक्ष प्रशांत पवार यांचे नाव आघाडीवर आहे. पदाधिकाऱ्यांच्या या पवित्र्यामुळे बंडखोरीची चर्चाही सुरू झाली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *