महाविकास आघाडीला रोखण्यासाठी दोन ‘पुतणे’ एकत्र येणार
Two 'nephews' will come together to stop Mahavikas Aghadi
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दिवाळीनंतर राज्यात निवडणुकीचे फटाके फुटतील, असा अंदाज आहे,
त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि राज ठाकरे तिसरी आघाडी तयार करतील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
‘दिल्लीवरून फर्मान आलं असेल, तुमचं कुठलं गणित बसत नसेल म्हणून ते तिसरी आघाडी करतील. अजित पवार, मनसे हे तिसरी आघाडी निर्माण करतील, असं दिसतंय.
त्याची ही सुरूवात झाली आहे. जागावाटपामध्ये घासाघीस करून मत खाण्यासाठी तिसरी आघाडी तयार होईल. सुपारीबाज पक्षाची संघटना मत खाण्यासाठी समोर येईल’, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.
‘दलित, मुस्लिम समाज तिसऱ्या आघाडीच्या मागे जाणार नाही. निवडून येण्यासाठी नाही तर मत खाण्यासाठी हे पक्ष उभे राहतील.
तिसऱ्या आघाडीत अजित पवार, मनसे हे पक्ष असतील. वंचितची भूमिका काय आहे, हे पाहावं लागेल’, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर
यांनी माकपला तिसऱ्या आघाडीमध्ये यायची ऑफर दिली आहे. माकप नेते जेपी गावित यांना प्रकाश आंबेडकरांनी ही ऑफर दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्षही विधानसभा निवडणूक लढणार आहे. तर मनोज जरांगे पाटीलही निवडणूक लढायची का नाही,
याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती, त्यामुळे जरांगे संभाजीराजेंच्या उमेदवारांना पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.