कंत्राट मिळवून देण्यासाठी लाचखोरी करणाऱ्या तीन रेल्वे अधिकाऱ्यांना अटक

Three railway officials arrested for taking bribes to get contracts

 

 

 

 

रेल्वेतील साहित्यखरेदी, तसेच पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील तीन उच्चपदस्थ सीबीआयने शुक्रवारी अटक केली.

 

 

मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील उपमुख्य (मटेरियल)व्यवस्थापक एच. नारायणन, पश्चिम रेल्वेतील उपमुख्य (मटेरियल) व्यवस्थापक अतुल शर्मा आणि वरिष्ठ (मटेरियल) व्यवस्थापक एच. डी. परमार अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

 

 

लाच देऊ करणाऱ्या समीर दवे आणि दीपक जैन यांचीही धरपकड करण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात मुंबईसह १२ ठिकाणी छापे टाकले आहेत.

 

 

विविध प्रकारचे साहित्य खरेदी- विक्रीच्या विभागात कार्यरत असलेले काही अधिकारी लाच घेऊन कंत्राट देत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

 

 

त्यातच काही कंपन्यांची नावे पुढे आली आणि या कंपन्यांचे प्रतिनिधी नियमित या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याचे समजले. पहिल्या प्रकरणात नोएडा येथील मेसर्स अँसेट इवाटा मदरसन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी नियमित लाच देऊन टेंडर मिळवत असल्याची माहिती मिळाली.

 

 

त्यातच उपमुख्य (मटेरियल) व्यवस्थापक एच. नारायणन हे लाच मागत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. दुसऱ्या प्रकरणात पश्चिम रेल्वेतील उपमुख्य (मटेरियल)व्यवस्थापक अतुल शर्मा आणि वरिष्ठ (मटेरियल) व्यवस्थापक एच. डी. परमार यांच्या विरोधात आरोप करण्यात आले होते.

 

 

हे दोघे कोलकाता येथील कंपनीच्या प्रतिनिधींकडून नियमित लाच घेऊन त्यांना साहित्य खरेदी, साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत करतात, असा आरोप होता. नुकतीच त्यांनी झारखंड येथील कंपनीकडून पैशाची मागणी केली असल्याची माहिती मिळाली.

 

सीबीआयने मिळालेली माहिती आणि तक्रारींची शहानिशा केल्यानंतर दोन्ही ठिकाणी सापळे रचले. मध्य रेल्वेचे एच. नारायणन, पश्चिम रेल्वेतील अतुल शर्मा आणि एच. डी. परमार हे सुमारे ७० हजार ५०० रुपयांची लाच घेताना सापडले. या तिघांना अटक करण्याबरोबर त्यांना लाच देणाऱ्यांनाही पकडण्यात आले. सीबीआयने दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.

 

रेल्वेच्या लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने मुंबईसह देशभरात १२ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंबई, कोलकाता, ग्रेटर नोएडा, जमशेदपूर, अहमदाबाद आणि बडोदरा यांचा समावेश आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घरातून लाखोंची रक्कम, स्थावर आणि जंगम मालमत्ताचे कागदपत्र, गुंतवणुकीचे कागदपत्र, सोने चांदीचे दागिने तसेच इतर महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *