बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण ;सहा आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय चा बळी ?
Badlapur sexual assault case; Akshay's sacrifice to save the six accused?

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता.
अक्षय शिंदे याने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात
अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
बदलापूर प्रकरणातील इतर सहा आरोपींना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी देण्यात आला, असा आरोप अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला.
अक्षय शिंदे याचे आई-वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा मृतदेह असलेल्या कळवा शासकीय रुग्णालयाबाहेर ठाण मांडून बसले होते.
या दोघांनाही अक्षयचा मृतदेह दाखवण्यात आलेला नाही. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह तुम्हाला दाखवू, असे अक्षयच्या आई-वडिलांना सांगण्यात आले आहे.
अक्षयचा मृतदेह आता जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला जाईल. त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे सांगितले आहे.
मात्र, अक्षय शिंदे याच्या पालकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
अक्षय शिंदे याच्या आईने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अक्षयच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पोलीस आम्हाला काहीच बोलले नाहीत.
आम्ही अक्षयला भेटायला तुरुंगात गेले होते तेव्हा त्याने मला विचारले, ‘मम्मी मला कवा घेऊन जाणार तुम्ही?’ मी त्याला म्हणाले की, मी वकिलांशी बोलून घेते,
आपण एका महिन्यानंतर तुला सोडवू. त्यानंतर मी अक्षयला विचारले की, तुला खायला-प्यायला देतात का? त्यावर अक्षयने, हो मला खायला देतात, असे सांगितल्याचे आईने म्हटले.
अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता.
त्यामध्ये काय लिहलं होतं, माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम,हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून,
तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल. पोलीस आता खोटं बोलत आहेत. त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत, असा आरोप अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केला.
या प्रकरणात आणखी सहाजण आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोराला मारुन टाकलं. त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला मारण्यात आले.
आम्ही सध्या स्टेशनवर कचऱ्यात राहतो, तिथेच झोपतो. पोलिसांनी अक्षयला पकडून नेलं, तेव्हापासून आम्ही फरार आहोत, मीडियासमोर आलो नाही.
याप्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला तयार आहोत, असे अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी म्हटले.
दरम्यान पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पण हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच राज्याचे गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी पोलिसांना हे आदेश दिले असा सवालही त्यांनी विचारला.
अक्षय शिंदे याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली. अक्षय शिंदेंने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या.
या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला असा सवाल त्यांनी विचारला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज जी गोष्ट झाली त्यावरून राज्यातमध्ये काही कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतोय. अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही.
बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते. गृहमंत्र्यांचे काही वचक आहे की नाही? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
गृहमंत्र्यांना ताबडतोब काढून टाकलं पाहिजे, कधी नव्हे ती महाराष्ट्राची बदनामी होत आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की, या एन्काऊंटरमुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. राज्यातली पोलिस यंत्रणा इतकी कूचकामी झाली आहे का? काय चाललंय का महाराष्ट्रात?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेसोबत अजून कोण आरोपी होतं, या गोष्टीच्या तळापर्यंत जाणं गरजेचं होतं.
सत्य बाहेर येऊन खऱ्या दोषीला शिक्षा व्हायला हवी होती. आता त्याचा एन्काऊंटर झाल्यामुळे हे कधीही समोर येणार नाही. आरोपीला मारण्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे हे तपासलं पाहिजे.
हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद आहे. अक्षय शिंदे याच्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस अधिकारी हे ज्युपिटर रुग्णालयात पोहोचल्यानंतर चालत जाऊन स्ट्रेचरवर झोपले, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते सोमवारी रात्री ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य चौकशी ही शाळेच्या मुख्याधापकांची आणि विश्वस्तांची व्हायला हवी.
अक्षय शिंदे यांनी त्यांच्याबद्दल काही माहिती देण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना संपवलं. शाळेचे अध्यक्ष तुषार आपटे आणि विश्वस्त उदय कोतवाल हे फरार आहेत, यामध्येच सगळं गुपित आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
बलात्कार झाला तिथल्या प्रशासनाने म्हणजेच शाळेने पोलीस प्रशासनाला काही सांगितलं नाही, नंतर सीसीटीव्ही गायब झाले. ज्या शाळेने गुन्हा लपवला त्या शाळेच्या संचालकांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
गुन्हा लपवणे हा देखील गुन्हा आहे. पोलीस स्टेशनला कंप्लेंट उशिरा घेण्यात आली. त्या पालकांना 13-13 तास बसवून ठेवण्यात आले. अक्षय शिंदे या प्रकरणातला सगळ्यात मोठा साक्षीदार ही होता
आणि गुन्हेगार होता. फास्ट कोर्टातून त्याला फाशी मिळाली असती जनतेला आणि त्या मुलींनाही न्याय मिळाला असता. अक्षय शिंदे याच्याकडे काही अधिकची माहिती तर नव्हती ना? याच्यात कोणाला वाचवण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
अक्षय शिंदेला मारण्यासाठी जे काही डोकं लढवलं गेलं, ज्या काही युक्त्या केलेल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत. अशा गुन्ह्यातल्या आरोपींना व्यवस्थित सुरक्षित ठेवायला हवं होतं.
कारण त्यांच्याकडे काय माहिती आहे हे कोणालाच माहीत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर कोणालाच विश्वास नाही. ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या असे दोन पोलीस अधिकारी हे चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असेल तर काही हरकत नाही,
पण अक्षय शिंदे याच्या हाताला रिव्हॉल्व्हर लागलंच कसं? एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात, तो काय पैलवान आहे का रिव्हॉल्व्हर काढून घ्यायला? त्याला फाशी होणारच होती व्हायलाच हवी होती.
ते करण्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना ते रस्ते बंद करून त्याचा असं काही फिल्मी शुटआऊट करता, एन्काऊंटर करता. तुम्ही स्वतःच्या सरकारबद्दलच संशय निर्माण करून घेतले आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
गाडीमध्ये एन्काऊंटर होतो का? खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं. तो गाडीमधून पळत होता, उडी मारून पळून गेला म्हणून गोळी मारली, असे तरी सांगायचे. हे सगळेच हे सगळं संशयास्पद आहे.
एखादा आरोपी कितीही मोठा गुन्हेगार असो, पाच पाच पोलीस बसलेले असताना काय हिम्मत होईल कोणाच्या कमरेच्या रिव्हॉल्व्हरला हात घालायची? कोणालाच गोळी लागली नाही
, हे सगळे सांगतात ते सगळं खोटं आहे. याचं कारण असं सगळे पोलीस अधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चालत गेले आहेत. समोर स्ट्रेचर होते त्यावर जाऊन झोपले, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.