धस- मुंडे गुप्त भेटीच्या प्रश्नावर अजितदादा पत्रकारांवरच भडकले

Ajitdada lashed out at journalists over the question of Dhas-Munde secret meeting

 

 

संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सुरू झालेला लढा एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलेला असताना देशमुख प्रकरणात ‘आवाज’ ठरलेले सुरेश धस यांनी कुणालाही न कळता, कुणालाही न सांगता रात्रीच्या अंधारात जाऊन मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली.

 

तेच धनंजय मुंडे ज्यांच्यावर सुरेश धस दोन महिने रात्रंदिवस आरोप करत होते. एरवी कधी कुणाला भेटणार, कधी कुठे पत्रकार परिषद घेणार हे माध्यमांना न चुकता कळविणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या भेटीवेळी मात्र माध्यमांना अंधारात ठेवून त्यांच्याशी हितगुज करून आले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीचा तपशील माध्यमांसमोर जाहीर केल्यानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची चांगलीच तारांबळ उडाली.

 

आमची भेट झालीच नाही, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला तर होय आमच्या दोन भेटी झाल्या पण प्रकृतीची विचारपूस केली, असे धस यांनी सांगितले.

 

आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या केलेल्या व्यक्तीविषयी एवढा ममत्वभाव धस यांना कुठून आला? असा प्रश्न सारा महाराष्ट्र विचारत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात मात्र या प्रकरणात काहीच शंका कुशंका वाटत नाहीयेत.

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात भेट झाल्याकडे आपण कसे पाहता, असे अजित पवार यांना विचारल्यावर त्यांनी पत्रकारांचीच शाळा घेतली.

 

कोण कुणाला भेटलं तर तुला काय वाईट वाटतंय? तुला वाईट वाटायचं काय कारण? असे नेहमीच्या शैलीत अजित पवार पत्रकारांवर डाफरले. त्यात यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृतपणाचा मुलामाही लावला.

 

धनंजय मुंडे मंत्री आहेत. सुरेश धस आमदार आहेत. मुंडे आजारी असल्याने धस यांनी त्यांची भेट घेतली. शेवटी हे राज्य यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी चालते.

 

आपल्याला त्यांनी सुसंस्कृतपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे कोण कोणाला भेटले यात दुश्मनी पाहायची नसते. तुमचाच एखादा पत्रकार मित्र आजारी असेल, ज्याच्याशी तुमचे पटत नसेल, अशा मित्राची विचारपूस तुम्ही करणार नाही का? असे म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांनाच ऐकवले.

 

आधी मी चंद्रकांत पाटलांना भेटायचो, आता आमची विचारधारा एक झाली आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत.

 

जर आजारी पडला तर सहकारी पत्रकार म्हणून माणुसकीच्या नात्याने तुम्हाला पण भेटायला येतात. त्यामुळे या भेटीकडे काहीतरी वेगळे झालंय असे पाहू नका, असा शहाजोग सल्लाही अजित पवार यांनी माध्यमांना दिला.

देशमुख कुटुंबामध्ये खूप दुःख आहे. अशी निर्घृण हत्या झाल्यानंतर, आभाळ कोसळल्यानंतर प्रत्येकाची संतप्त भावना असते. यंत्रणेकडून लवकरात लवकर रिपोर्ट यावेत.

 

यामध्ये कोणी दोषी असेल त्यांची फिकीर केली जाणार नाही. कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाणार, असे पालुपदही त्यांनी ऐकवले.

 

यातली एक व्यक्ती साठ दिवस झाले तरी सापडत नाहीये. आम्हाला पण त्याचे वाईट वाटते आहे. पण शेवटी आरोप झाले म्हणून कारवाई करता येत नाही. कोणालाही पाठीशी घालण्याचे काम महायुती सरकार करणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *