भाजप आमदाराला थेट काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा
Congress-Sharad Pawar group directly supports the BJP MLA
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मिरज पॅटर्न चर्चेत आलाय. कारण मिरज पॅटर्नमधील सुरेश आवटी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ,
राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही माजी नगरसेवकांनी थेट विद्यमान भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये विशेषतः मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे यांचाही समावेश आहे.
मेंढे यांच्यासह करण जामदार आणि शरद पवार गटाच्या माजी नगरसेवक यांनी देखील खाडे यांना पाठींबा दिल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात मविआचा उमेदवार देताना आता डोकेदुखी वाढणार आहे.
दरम्यान मिरजमधील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी थेट भाजप आमदाराला पाठींबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर सांगली काँग्रेस, राष्ट्रवादीकडून काय कारवाई केली जातेय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी मिरज पॅटर्नमधल्या नेतेमंडळींनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे,
पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्या सोबतच राहू, असं सुरेश खाडे यांना सांगितलं होतं. मिरजेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्नमधील सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलं आहे.
सुरेश खाडे यांना पाठिंबा दिलेल्यांमध्ये माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी सभापती सुरेशबापू आवटी, माजी महापौर संगीता खोत, माजी विरोधी पक्ष नेते संजयबापू मेंढे,
माजी महापौर स्व. विवेक कांबळे यांचे सुपुत्र श्वेत कांबळे, करण जामदार, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, योगेंद्र कांबळे, अतहर नायकवडी, गजेंद्र कुल्लोळी, निरंजन आवटी,
गायत्री कुल्लोळी, गणेश माळी, प्रियांका पारधी, पांडुरंग कोरे, अस्मिता सलगर, शांता जाधव, संदीप आवटी यांच्यासह काँग्रेस आणि
राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवकाचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीस मैनुद्दीन बागवान व संगीता हारगे हे अनुपस्थित असले तरी त्यांनी दूरध्वनीवरून सुरेश खाडे यांना संपर्क साधत जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले आहे.