उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान ‘अमित शाह बंद दाराआडचे धंदे सोडा, हिंमत असेल तर…’,
Uddhav Thackeray's direct challenge 'Amit Shah stop door-to-door business, if you dare...'
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर सडकून टीका केली.
“ज्याला मी बाजारबुनगा म्हटलं ते आठ-दहा दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. कोण येऊन गेले? त्यांचं दुर्दैवं असं आहे की? दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात येऊन गेले,
थोड्या दिवसांत माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम. ठोकलं तिकडे. ते तिकडे मला म्हणाले होते की, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे संस्थापक. मी औरंगजेब फॅनक्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अब्दाली आहात,
अहमद शाह अब्दाली. चार दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. बंददाराआड चर्चा. काय चर्चा? उद्धव ठाकरेला संपवा. शरद पवारांना संपवा. त्यांचा पक्ष फोडा,
कार्यकर्ते फोडा, बुथ लेव्हलचे कार्यकर्ते फोडा. अहो, अमित शाह हे बंद दाराआडचे धंदे सोडा. हिंमत असेल तर मैदानात या. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करुन दाखवा?”, असं चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं.
“जे मी पुण्यात बोललो होतो, हे बाजार बुनगे येतात आणि महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात. शिवसेना संपवा? अरे संपवायचं असेल तर या. तुमच्या किती पिढ्या उतरतात ते मी बघतो.
शिवसेना का संपवायची? आम्ही तर तुमच्याचबरोबर होतो. आज माझ्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आहेत. पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना?
आम्ही 25 ते 30 वर्षे हिंदुत्वच्या मुद्द्यावरुन सोबत राहिलो. मग 2014 मध्ये दिल्लीत तुमचा पंतप्रधान बसल्यावर काय झालं होतं?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“एकनाथ खडसे यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे आणि ती खरी आहे. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अंतिम टप्प्यात जागावाटप आलं होतं.
दोन-पाच जागा इकडेतिकडे राहिल्या होत्या. खडसेंचा फोन आला की, उद्धवजी आता बस झालं. आम्हाला नाही वाटत की, आता युती पुढे टिकावी.
मी म्हटलं, काय झालं? दोन-चार जागांचा प्रश्न संपवून टाकू. तर खडसे म्हणाले की, नाही, नाही, बस, मला वरुन सांगण्यात आलं आहे की,
आता आपली युती तुटली. 15 दिवसांत युती तुटली आणि 63 जागा निवडून आल्या. त्यानंतर त्यांना समजलं की, महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर कोथळा बाहेर येतो”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
“आम्ही म्हणजे मुनगंटीवार नाहीत. बोलतात काय आणि करतात काय, जातात कुठे. त्यांनी युती तेव्हा तोडली होती. त्यांनी 2019 साली देखील तेच केलं. 25 ते 30 वर्षात तुमच्यासोबत राहून शिवसेनेचा भाजप झाला नाही,
तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असल्यावर काँग्रेस कसा होणार? म्हणजे माझ्यासोबत असला की साधू संत. दुसऱ्याकडे गेला तर चोर. हे तुमचं हिंदुत्व कुठलं.
भाजपचं हिंदुत्व थोतांड आहे. नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे. मी मोहनजींना विचारतो की, आम्ही तुम्हाला हवेत की नको ते सोडा.
पण ज्या पद्धतीने भाजप हिंदुत्वाचा थयथयाट करत आहेत ते तुम्हाला मान्य आहे का? भ्रष्टाचारी आणि इतरांना घेतलं जात आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
“शिवाजी महाराजांनी सुल्तानी संकट रोखलं. म्हणून हे दिल्लीवाले पाहत आहे. आज दिल्लीवाले पाहत आहे. त्यांना महाराष्ट्रातील जनता कमकुवत वाटते की काय. तुमच्या साक्षीने सांगतो,
मोदी आणि शहा यांना सांगतो तुमची भीक नको. हक्काचं पाहिजे. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही हक्काचं मागत आहोत. आम्हाला फुकटचं काही नको.
त्यांना वाटतं मी म्हणजे कोणी तरी आहे. दररोज शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभे राहतात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“ही वेळ येऊ देणार नाही. मिंधे म्हणजे महाराष्ट्र नाही. गुलाबी जॅकेटवाले महाराष्ट्र नाही. ही जनता महाराष्ट्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“लाडकी बहीण योजना. तुमच्या खिशातील पैसे देत नाही. माझ्या जनतेच्या खिशातील पैसे देत नाही. मी शेतकऱ्यांची कर्ज माफी केली. पण कधी एक कार्यक्रम घेऊन पैसे देत असल्याचं म्हटलं नाही.
कर्जमुक्ती मेळावे घेतले नाही. कारण मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं. आमच्याकडे आज काही नाही. तुम्ही आमचा पक्ष आणि निशाणीही चोरली आहे. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही.
महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावता. मी तुम्हाला १५०० रुपयेही देत नाही. तरीही तुम्ही आला. तुम्हाला पैसे दिले नाही, नाश्ता दिला नाही. तरीही तुम्ही आला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“उद्धव ठाकरे म्हणजे माणूस नाही तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. मी तुम्हाला वचन देतो. हे सरकार उलथवून टाकायचंच. उलथवून टाकायचंच. मला निसटता विजय नको.
दणदणती विजय हवा. नागपूरमधील त्या व्यक्तीला पाडायचं आहे. सरकार आल्यावर पहिल्याप्रथम महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी मुख्यमंत्री असताना एक तरी उद्योग बाहेर गेल्याची बातमी आली का? मिंधे झाल्यावर कशी आली? त्यांना शिवसेना रोखायची आहे. कारण त्यांच्या महाराष्ट्र लुटीच्या आड शिवसेना आहे.
पवार आहेत, काँग्रेस आहे. ही स्वाभिमानाची लढाई आहे. रामटेकच्या सहाच्या सहाही जागा आल्याच पाहिजे. उमेदवार शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल.
तुम्ही मला सहाहीच्या सहाही जागा निवडून देण्याचं वचन दिलं पाहिजे. मला वचन द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. पण त्याआधी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते सुनील केदार यांचे नाव घेत त्यांना महत्त्वाचा सल्लादेखील दिली.
“रामटेक हा आपला बालेकिल्ला. सलग पाचवेळा शिवसेनेने जिंकला आहे. पण महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही”, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.
“सुनील माझे जुने सहकारी आहेत. अगदी 1995 मध्ये सुनील निवडणुकीला उभे होते. त्यावेळी मी बाबासाहेबांना भेटलो होतो आणि म्हणालो होतो की, बाबासाहेब महायुतीचं सरकार येईल याची खात्री आहे.
पण आम्हाला अपक्षांची गरज लागेल. त्यावेळी बाबासाहेबांनी महायुतीचा विजय झाला तेव्हा फोन केला की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेव्हापासून सुनील माझा सहकारी आहे.
नंतर थोडासा दुरावा झाला. काँग्रेस, शिवसेना, भाजपा, पण परत आपण एकत्र आलेलो आहेत. आपल्याला अजून कुणी ओळखलेलं नाही. एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही. पाठीमागून वार करायचा नाही”, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
“रामटेक मागितला, आम्ही रामटेक दिला. मला अभिमान आहे की, शिवसैनिकांनीदेखील दुजाभाव केला नाही. महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याबद्दल धन्यावाद देतो.
ज्यावेळेला रश्मी ताईंचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं तेव्हा वाटलं की, आता काय करायचं? सुनील म्हणाले, काळजी करु नका. बर्वे दादा आहेत, निवडून येणार.
निवडून आले आणि काल निकाल आला, प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णयच अवैध होता. मग गुन्हेगार का? आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात ते किराणा दुकानात घेतात का?
ज्यांनी प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकलं पाहिजे तर ही लोकशाही आहे हे म्हटलं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“जनतेचा अनादर किती करायचा? काल तुम्हाला माहिती आहे, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा युवासेनेने जिंकल्या.
सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार, त्यामध्येही आडकाठी आणली होती. दोन वर्ष सिनेट निवडणूक पुढे ढकलत होते. आता म्हणत आहेत की,
जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरणारे आहेत. हो आहेच, सुशिक्षित मतदार होते. पेद्रे कोर्टात गेले. आपणही कोर्टात गेलो आणि कोर्टाने निवडणूक घेण्यास सांगितलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.