संतप्त गावकऱ्यांनी शिक्षण मंत्र्याच्या कार्यक्रमाच्या मंडपाला आग लावून मंडप जाळला
Angry villagers set fire to the education minister's program pavilion and burnt the pavilion
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल पुढच्या आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सध्या विकासकामांच्या उद्घाटनांचा आणि भूमीपूजनांचा धडाकाच सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच कोट्यवधी रुपयांचा विकासकामांचं भूमीपूजन पार पडलं. तसेच राज्य सरकारकडून राज्यभरात अशा प्रकारचे विविध विकाकामांचे भूमीपूजन केले जात आहे.
पण काही वेळेला विकासकामांना स्थानिकांचा विरोध होत असतो. स्थानिकांच्या काही मागण्या असतात. त्यासाठी स्थानिक अनेकदा आक्रमक होताना दिसतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत अशीच काहीशी घटना घडली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ग्रामस्थांचा विरोध होता. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट कार्यक्रमाचा मंडप जाळून उखडून टाकला आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होऊ घातलेल्या बांदा-दाणोली रस्ता कामास विरोध करत तिथं उभारलेला मंडप स्थानिकांनी जाळून टाकला आहे.
कोल्हापूर आणि गोव्याला जोडणाऱ्या बांदा-दाणोली या राज्य मार्गाला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत
तोपर्यंत कार्यक्रमाचे भूमिपूजन होऊ देणार नाही, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रातोरात ग्रामस्थांकडून बैठक घेऊन त्या ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप काढून टाकण्यात आला.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सावंतवाडी शहराला पर्यायी रस्ता ठरणाऱ्या बांदा-दाणोली या रस्त्याला 128 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्या कामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार होते. दरम्यान आज दुपारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.