पालकमंत्रिपदावरुन महायुतीत घमासान
Clashes in the Grand Alliance over the guardian ministership

उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रात नऊ कॅबिनेट;
तसेच एक राज्यमंत्री नियुक्त केल्याने पालकमंत्रिपद कोणाकोणाला द्यायचे, यावरून जोरदार शीतयुद्ध रंगले आहे.
बीडचे पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता बाहेरील जिल्ह्यातील नेत्याला देण्याची दाट शक्यता आहे.
ही जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्यावर सोपवायची की नाही, यावर जोरदार खलबते सुरू असल्याचे समजते.
पवार पुण्याचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. पाटील यांना कोणता जिल्हा मिळणार, यावर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणिते अवलंबून आहेत.
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांना प्रत्येकी चार आणि कोल्हापूरला दोन अशी दहा मंत्रिपदे मिळाली आहेत.
पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी पवार अत्यंत आग्रही असतात. गेल्या वेळीही पाटील यांच्याकडील पुण्याचे पालकमंत्रिपद त्यांनी स्वतःकडे घेतले होते.
या वेळीही तेच पुण्याचे पालकमंत्री असू शकतील. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे यापैकी एकाची वर्णी पालकमंत्रिपदी लागेल, अशी चर्चा आहे.
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच आहे.
कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून आले असले; तरीही त्यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते.
मुश्रीफ पालकमंत्रिपदासाठी अत्यंत आग्रही असल्याचे चित्र गेल्या वेळी दिसले होते. त्यामुळे ते या पदासाठी प्रतिष्ठेचा विषय करू शकतात.
दत्ता भरणे यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोलापूरची जबाबदारी होती.
त्यामुळे सोलापूर मिळवण्यासाठी त्यांचाही प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील
आणि साताऱ्यातील प्रत्येकी दोन; तसेच कोल्हापुरातील एक अशा पाच मंत्र्यांनी सोलापूर आणि सांगलीचे मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
गेल्या सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्रिपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती अशा दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली होती.
या वेळी पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे असल्याने पाटील यांना कुठल्या जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार,
यावर राजकीय गणिते अवलंबून आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.
बीड जिल्ह्यातील राजकारण सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. वाल्मिक कराड प्रकरणावरून धनंजय मुंडे टीकेचे धनी ठरले आहेत.
बीडमधील जातीय तणाव हा कळीचा मुद्दा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघाही भाऊ-बहिणींना पालकमंत्रिपद देऊ नये,
अशी सरकारमध्ये चर्चा आहे. त्यामुळे बीडचे पालकमंत्री कोण होणार, की पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला ही जबाबदारी दिली जाणार, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.