अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव

Lawrence Bishnoi's name comes up after attack on actor Saif Ali Khan

 

 

आज सकाळी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आबे. यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

 

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत, “देशातील लोकांचे रक्षण करण्यात भाजपा अपयशी ठरत आहे.

 

गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंड निर्भयपणे गुन्हे करत आहे. असे दिसते की, त्याला संरक्षण दिले जात आहे,” अशी टीका केली आहे.

 

दरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. गेल्या काही काळात मुंबईत सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि बाब सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये त्याचे कनेक्शन समोर आले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “एवढ्या सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या इतक्या मोठ्या अभिनेत्यावर त्याच्याच घरात हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे.

 

यामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. नंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती.

 

जर सरकार इतक्या मोठ्या सेलिब्रिटींना सुरक्षा देऊ शकत नसेल तर सामान्य लोकांचे काय? डबल इंजिन सरकार ना सुशासन देऊ शकते ना लोकांना सुरक्षा.”

 

अभिनेता सैफ अली खानवर आज सकाळी त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

सैफ अली खान त्याच्या घरी असताना घरात अचानक एक अज्ञात व्यक्ती शिरला आणि त्याने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या. त्यानंतर सैफ अली खानला तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

 

हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार, त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी आज माध्यमांना दिली.

 

दरम्यान अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

 

त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने त्याला रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्याला खोल जखमा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानुसार, त्याच्यावर आज शस्त्रक्रिया पार पडली.

 

या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी आज माध्यमांना दिली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर माध्यमांना म्हणाले, “सैफ अली खानवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिकसर्जरी झाली आहे. त्यांना ऑपरेशन थिएटरमधून त्यांना आयसीयूत शिफ्ट केले आहे.

 

एक दिवस त्यांचं निरिक्षण केलं जाईल. ते सध्या स्थिर आहेत. ते लवकरच रिकव्हर होतील. त्यांना २ खोल जखमा आहेत. दोन किरकोळ जखमा आहेत. अडीच इंचाचं चाकूचं टोक त्यांच्या मणक्यातून काढण्यात आला आहे.”

 

त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या मज्जातंतूतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मध्यरात्री २ च्या सुमारास सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल झाले.

 

त्यांच्यावर हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी होते. त्यांच्या मणक्यात चाकूचा भाग अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला आहे. लिकिंग स्पायनल फ्लुएडवरही उपचार करण्यात आले.

डाव्या बाजूला आणि मानेवरील असलेल्या खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी टीमकडून उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आता पूर्णता स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहेत.”

मज्जातंतूतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे, सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. नीरज उत्तमनी यांनी सैफ अली खान यांच्यावर उपचार केले. सैफला सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं जात आहे.

 

 

चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे?

 

मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खानवरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे.

 

महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर, वर्षा गायकवाड यांनीही या हल्ल्यानंतर राज्य सरकारच्या गृह विभागाला लक्ष्य केलं आहे. तसेच, सामान्यांच्या सुरक्षेचं काय असा सवालही उपस्थित केला आहे.

 

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाजपा सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रीय आहेत.

 

मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत. बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशिर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या,

 

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही.

 

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे.

 

अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर रात्री त्यांच्या घरात झालेला जिवघेणा हल्ला ही अत्यंत गंभीर घटना आहे. वांद्र्यासारख्या भागात अशा प्रकारची ही तीसरी घटना घडलेली आहे. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या,

 

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार व आता सैफ अली खानवरील हल्ला. सैफ अली खानवरील हल्ल्याने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून खासगी सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुद्धा असुरक्षित असतील तर सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय, असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *