उद्धव ठाकरे कडाडले म्हणाले ; राक्षसांचा वध करण्याची वेळ आली
Uddhav Thackeray said bitterly; Time to slay the demons
ठाकरे गटाने नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. दार उघड बये दार उघड, अशी मोहीम ठाकरे गटाने हाती घेतली आहे. राक्षसांचा वध करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोधंळ घालायचाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आमची सत्ता आली की तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही पहा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजप भेकडांची पार्टी आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या भवानीला मी आज साद घालतोय, बये दार उघडं! ज्या ज्या वेळेला धर्मावर अधर्माच संकट आलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम आणि आमच्या भवानी मातेने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केला आहे. तीच वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आत्ता जिथे मंदिर आहे तिथे पर्णकुटी होती, भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई तिथे राहिले होते. शुर्पणखेचे नाक आणि कान हे सुद्धा प्रभु श्रीरामचंद्राने इथेच कापले.
त्यानंतर 14000 राक्षस प्रभु रामचंद्राला मारायला आले होते आणि आता जसं माझ्यासमोर भव्य रुप आहे तस प्रभू रामचंद्राने अति भव्य तारक स्वरुप धारण करुन राक्षसाचा वध केला होता. काळ स्वरुप काळा राम माझ्या समोर आज उभा आहे, असे ठाकरे म्हणाले.
सत्ताधाऱ्यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेच योगदान काय? ते हे समोर बसले आहे. त्या वेळेला जेव्हा सगळे पळाले होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी जर जबाबदारी घेतली नसती तर?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
आता तर काही असे बिनडोक लोक म्हणत आहेत की शंकराचार्यांचे योगदान काय हिंदू धर्मामध्ये? मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचायं, जरा कोणी काही सनातन धर्माबद्दल बोललं तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाते.
जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षात जे बाजारबुणगे आयाराम बनले आहेत भ्रष्टाचारी…हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी तुम्ही पक्षात घेतले,
मग मी असे म्हणू का की, भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही रात्रीबेरात्री भ्रष्टाचार्यांना हुडी घालून भेटतायं, त्यांना मोठीमोठी पद देताय… प्रफुल पटेलांसोबत तुमचे फोटो येत आहेत. देशद्रोही इकबाल मिर्चीसोबत त्यांनी व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होता.
आपल्याकडे देखील होते, घाबरुन पळाले, खोक्यात बंद झाले. शिवसेनाप्रमुख आपल्याला शिकवून गेले शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. ज्यांना शेळी व्हायचंय त्यांनी मिंध्यांकडे निघून जा.
राममंदिर बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. काश्मीरमधील 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदुंवर अत्याचार होत असताना सुद्धा हिंदुंच रक्षण होण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता.
पण जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली, अटलबिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मदत केली, ती शिवसेना आज तुम्ही संपवायला निघालात? हे तुमचं हिंदुत्व?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
स्वत: कडेकोट बंदोबस्तात रहायचं, पोलीस निमलष्करी, लष्करी, बाँब जॅमर लावून तुम्ही छप्पन्न इंचाची छाती दाखवता? अरे माझ्या शेतकर्याची हडकुळी छाती तुम्हांला भारी पडणार आहे, असे ठाकरे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्तेच नाहीत. माझ्याकडे मर्द शिवसैनिक आहेत जे शिवसेनाप्रमुखांनी दिले. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. मी वारसा घेऊन पूढे चाललो आहे. पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणीही कार्यकर्ता नाही, दंगल झाली की आतामधे शेपूट घालून पळणारी ही अवलाद आहे.
इडी, सीबीआय, इन्कमटॅक्स हे यांचे घरगडी धाडी टाकतात. घर माझ्या कार्यकर्त्यांच्या अन् पाय ताणून बसतात हे नालायक. येऊ द्या आमची सत्ता, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही पहा.
शासकीय यंत्रणांचा पैसा देखील सामान्य माणसाच्या खिशातून जातो हे त्या यंत्रणांच्या लोकांनी लक्षात ठेवावं… भेकड लेकाचे! बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा आता भेकडांची पार्टी आहे,
स्वत:मधे कर्तृत्व नाही, नेता देऊ शकत नाहीत. भाकडही आहेत आणि भेकड देखील. हे म्हणे हिंदु! जो महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीला घेऊन गेला त्या महाराष्ट्राच्या मुळावर घाव का घालता?
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात. महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही. जा त्या नार्वेकरांना सांगा हिंमत असेल तर इकडे मधे येऊन सांग शिवसेना कुणाची?
2014 मध्ये भाजपने युती तोडली आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर केवळ पंधरा दिवसांत एकट्या शिवसेनेचे 63 आमदार महाराष्ट्राने निवडून दिले. प्रभु श्रीराम एकवचनी होते, सत्यवचनी होते. अमित शाह यांनी जे वचन दिलं होतं ते पाळलं नाही. वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वत:ला रामभक्त मानता?
जर वचन पाळलं असतं तर देवेंद्र फडणवीस जे पाव मुख्यमंत्री झाले आहेत ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते अडीच वर्ष. जी फोडाफोडी केली ती न करता अख्खी शिवसेनेची खरी ताकद तुमच्यासोबत (नरेंद्र मोदी) असती आणि आत्ता जे तुम्हाला वारंवार महाराष्ट्रात यावं लागतंय त्याची गरज लागली नसती, महाराष्ट्राने म्हणजे शिवसेनेने पुन्हा एकदा तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असत.
तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता, पक्ष पळवता, पक्ष चोरता. कलम 370 काढलं आम्ही कौतुक केलं पण कलम कागदावर काढलं, अजुनही काश्मीरची परिस्थिती सुधारली नाही. तिकडे हत्या होतच आहेत. माझा बळीराजा जर उपासमारीने मरत असेल,
तर तुमच्या उपवासाचं कौतुक ते काय? मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय? ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघालायत?
नरेंद्र मोदी यांनी उपवास केले पण जगाचा पोशिंदा माझा शेतकरी उपाशी आहे. पंतप्रधानांच कर्तव्य आहे माझ्या देशात एकही पोट उपाशी राहणार नाही याची काळजी घेणं. लोक विचारतात,
मी मधे इंडियाच्या बैठकीला गेलो होते. अनौपचारिक जेवण होतं, एक नेहमीचा प्रश्न, लेकिन विकल्प क्या हैं? म्हटला हाच आमचा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाकडे विकल्प काय? एकच चेहरा आहे.
समोर यांच्या दहा वर्षांचा कारभार दिसतोय. जातीपातीमध्ये दंगे भडकवण्याच काम यांच दिसतंय. नोकर्या नाहीत. शेतकर्यांच उत्पन्न दुप्पट वाढलं असेल तर द्या मत त्यांना.
पीक वीमा योजना लाभ मिळालायं? महिलांना उज्वला योजनेचा लाभ मिळालायं? तुमच्या घरात नोकरी मिळाली? तुमच्या गावात नवीन उद्योग आलायं? मग कशासाठी त्यांना मत देणार?
अरे तुम्ही शिवसेना संपवलीत ना? मग का सारखे माझ्या शिवसैनिकांच्या, नेत्यांच्या घरी धाडी घालता? कर्नाटकात एकाने सांगितलं, मला नोटीस द्याच, करोना काळात कर्नाटकात जे घोटाळे केलेत ते बाहेर काढतो. चिडीचुप!