बिहारमधील भाजप सरकारचे काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?
What is the Maharashtra connection of the BJP government in Bihar?
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी 9 व्या वेळेस नितीशकुमार यांनी शपथ घेतली. भाजपसोबत स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारचे शिल्पकार महाराष्ट्रातील भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत.
ज्यांनी मागील दीड वर्ष मेहनत करून जेडीयू-आरजेडीसरकारला सुरुंग लावत भाजप सोबत जेडीयूला घेत नवं सरकारं स्थापन करण्याची मोहीम फत्ते केली.
राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात गेलेले विनोद तावडे यांनी या सत्ताबदलात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे.
दीड वर्षांपूर्वी बिहारमध्ये भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयू यांनी सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार राज्याची जबाबदारी मिळाली.
ज्या पद्धतीने भाजपला सत्तेतून बाजूला करण्यात आलं होतं, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा भाजपला सत्तेत आणण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आली होती.
बिहारमध्ये जातीय राजकारणात लालूप्रसाद यादव तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांना शह द्यायचा असेल तर पहिला जातीचा अभ्यास करावा लागेल हे लक्षात घेऊन विनोद तावडे यांनी
एक मास्टर प्लॅन रचला आणि दीड वर्षानंतर सत्तेच्या रूपाने तो यशस्वीरित्या तळागाळात रुजल्याचं राजकीय जाणकारांच्या लक्षात आलं आहे.
बिहारमध्ये जमीनदार, ओबीसी आणि दलित राजकारण महत्त्वपूर्ण आहे. या राजकारणाला जर शह द्यायचा असेल तर त्यासाठी भाजपमध्ये देखील बदल करावे लागतील याची स्पष्ट सूचना केंद्रीय नेतृत्वाकडे विनोद तावडे यांनी केली.
त्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने तातडीने विनोद तावडे यांच्या अपेक्षेनुसार राज्यातील महत्त्वाच्या पदांचे वाटप केले, जबाबदारी निश्चित केली.
> भाजप जेडीयूच्या सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्ष असणारे विजयकुमार सिन्हा यांच्यावर देखील तशाच तोलामोलाची जबाबदारी देताना त्यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली.
भूमिहार जातीचे विजयकुमार सिन्हा यांची नियुक्ती करुन भाजपने बिहार मधील ‘अगडा’ अर्थात सवर्ण वर्गाला आपल्याजवळ केलं.
बिहारमध्ये भाजपला ओबीसी चेहऱ्याची नितांत गरज होती आणि यासाठीच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षातील महत्त्वाचा चेहरा सम्राट चौधरी याला गळाला लावताना थेट प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्याच्या गळ्यात घातली. चौधरी हे मागासवर्गाशी संबंधित आहेत.
हरी सिन्हा या कोळी समाजाशी संबंधित अति पिछडा प्रवर्गातील विधान परिषदेच्या आमदाराला तर थेट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. याने भाजपने बिहार मधील ‘अति पिछडा’ वर्गापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरु केला.
या तीन प्रवर्गां व्यतिरिक्त दलित प्रवर्गाला आपलंसं करण्यासाठी राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली.जे मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत.
एकीकडे राजकीय फेरबदल करत असताना दुसरीकडे तळागाळातील प्रत्येक मतदार आपल्या सोबत असावा यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सातत्याने विविध कार्यक्रम आयोजन करण्याचे आदेश दिले आणि विनोद तावडे स्वतः या कार्यक्रमांवर लक्ष देत होते.
त्याशिवाय, स्वतः या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू लागले. याचाच फायदा भाजपला नितीश कुमार लालूप्रसाद यादव यांची हक्काची व्होट बँक असणारी आगडा, पिछडा आणि अति पिछडा तोडता आली. या व्होट बँकमध्ये भाजपने शिरकाव केला.
लालूप्रसाद यादव हे ज्या समाजातून येतात त्या समाजाला आपल्या सोबत घ्यायचा असेल तर भाजपच त्या समाजाला न्याय देऊ शकतो असा विश्वास निर्माण करण्याची गरज विनोद तावडे यांना वाटली
आणि याचसाठी त्यांनी मध्य प्रदेशात मोहन यादव मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना याचं लाईव्ह चित्रीकरण यादव समाजाला पाहण्यासाठी ठिकठिकाणी बिहार मध्ये उपलब्ध करून दिलं.
बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देणे हे देखील ओबीसीला आपलंसं करण्याचा एक भाग असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार ज्या प्रकारे भाजपने जातीय गणित जुळवण्यास सुरुवात केली होती त्यामुळे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षातील आमदारांना अस्वस्थ वाटू लागलं होतं.
जर भाजपने असंच काम सुरू ठेवलं तर आगामी निवडणुकांमध्ये भाजप सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण आताच सत्तेत सहभागी व्हायला हवं अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली. याची सुरुवात नितीशकुमार यांचे विश्वासू संजय झा आणि देवेश चंद्र ठाकूर यांनी केली.
एकीकडे प्राथमिक चर्चा सुरू असताना दुसरीकडे विनोद तावडे यांनी नितेश कुमार यांची दुखरी नस ओळखून त्यावर काम करायला सुरुवात केलं.
लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जाताना नितीशकुमार यांना ‘इंडिया’ आघाडीचा चेहरा केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांना चेहरा केल्यानंतर नितीशकुमार नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.
याचवेळी मास्टर स्ट्रोक खेळताना विनोद तावडे यांनी ऑपरेशन लोटस सुरू केलं आणि आता बिहारमध्ये भाजप सत्तेत येणारं आहे.
जेडीयू सोबत भाजप सत्तेत जाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर संजय झा आणि देवेश चंद्र ठाकूर यांच्या भाजपसोबत सात वेळा बैठका पार पडल्या.
अखेर नितीश कुमार यांची जिताराम मांझी आणि चिराग पासवान यांना सोबत घेणारं नाही या भूमिकेला मवाळ करण्यासाठीं विनोद तावडे आणि नितीश कुमार यांची तीन वेळा बैठक पार पडली आणि त्यानंतर मांझी यांच्या मुलाला महत्त्वाचे पद तर चिराग पासवान यांच्याबाबत लवकरच मार्ग काढण्याचा निर्णय झाला आहे.
अखेर नितेश कुमार सत्तेत सहभागी होताना सध्या तरी सामंजस्य सरकार चालवण्याचा तसेच लोकसभेच्या चाळीस पैकी 39 जागा जिंकण्याचं ध्येय दोन्ही पक्षांसमोर आहे त्यामुळे आगामी काळात ही युती दीर्घकाळ टिकणारी पुन्हा बिहारमध्ये भूकंप होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.