ठाकरे -शिंदे गट भिडले आणि थेट पोलीस ठाण्यातच झाला राडा
The Thackeray-Shinde factions clashed and a riot broke out directly in the police station itself
शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले होते.
यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकीनंतर धक्काबुक्की झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मिलिंद दोडके या पोलीस कर्मचाऱ्याला देखील झटापटीत धक्काबुक्की झाली.
पोलिसांनी प्रतिमा ठाकूर आणि स्वप्नील काशीकर यांच्यासह दोन्ही गटाच्या ८ लोकांवर ३५३ (शासकीय कामात अडथळा आणणे) चा गुन्हा दाखल केला आहे.
सोबतच दोन्ही गटांच्या तक्रारीवरून रामनगर चंद्रपूर पोलिसांनी २९४, ५०६ आणि ३२३ (शिवीगाळ, धमकी देणे आणि धक्काबुक्की करणे) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलांची किरकोळ भांडणे होती. खरंतर या वादात राजकीय वाद नव्हताच. मात्र त्यावरून ठाकरे-शिंदे गट आमने-सामने उभे झाले.
या मुलांची भेट घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटातील पदाधिकारी गेले. मात्र तिथं त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर दोघेही तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले.
या दरम्यान एका गटातील कार्यकर्ता दुसऱ्या गटातील कार्यकर्त्याला मारहाण करण्यासाठी धावला. पोलिसांनी दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान दोडके नामक हवालदाराला धक्काबुक्की झाली. या प्रकरणी आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.