गुजरातमध्ये भाजपचे बम्पर बहुमत ,पण काँग्रेसने टाकला डाव त्याचा थेट घाव
BJP's bumper majority in Gujarat but Congress's plan is its direct wound

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारनं गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. शिंदे सरकारनं घेतलेल्या निर्णय देशभरात गाजला.
संपूर्ण देशात निर्णयाची बरीच चर्चा झाली. अन्य राज्यांमध्ये गायीला असा दर्जा का नाही, अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली. आता गुजरातमध्ये काँग्रेसनं गायीला राज्यमाता जाहीर करण्याची मागणी केली आहे.
त्यासाठी विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे. यामुळे सत्ताधारी भाजपची गोची होण्याची शक्यता आहे.
गोमाता राष्ट्रमाता अभियानाच्या अंतर्गत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद बुधवारी अहमदाबादला पोहोचले. त्यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अमित चावडा यांनी
जाहीर कार्यक्रमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली. गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा आहे. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात यासाठी काँग्रेस एक विधेयकही मांडणार आहे.
गुजरातला भाजपच्या हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा मानलं जातं. इथे भाजपनं घेतलेले निर्णय पुढे भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्येही घेतले गेले.
आता इथे काँग्रेसनं केलेल्या मागणीनं भाजपची गोची होण्याची शक्यता आहे. गोमाता राष्ट्रमाता अभियानाच्या अंतर्गत अहमदाबादच्या श्री सोला भागवत विद्यापीठाचे जगतगुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
आणि देशातील प्रसिद्ध संत, धर्मगुरु अहमदाबादला पोहोचले आहेत. गायीला पशूंच्या यादीतून हटवून तिला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी शंकराचार्यांनी लावून धरली आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसच्या लोकसभेच्या एकमेव खासदार गेनीबेन ठाकोर यांनी गायीला राष्ट्रमाता देण्याचा विषय याआधीच लोकसभेत उपस्थित केला आहे.
त्यावेळी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ठाकोर यांचं कौतुक केलं होतं. ठाकोर आता केवळ बनासकांठाच्या
नेत्या राहिलेल्या नाहीत. तर त्या सनातन्यांच्या नेत्या झाल्या आहेत, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले होते.
गुजरातच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या १८२ आहे. त्यातील २ जागा रिक्त आहेत. यातील वाव मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
सध्याच्या घडीला १८० आमदार असलेल्या विधानसभेतील भाजप सदस्यांची संख्या १६१ आहे. त्यांच्याकडे २ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे.
काँग्रेस आमदार अमित चावडा यांनी खासगी सदस्य विधेयक मांडल्यास त्याला विरोध करणं भाजपला सोपं जाणार नाही. विधानसभेत आपचे ४, समाजवादी पक्षाचा १ आमदार आहे.