उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी जाहीर , मुस्लिम उमेदवाराला दिली संधी
Shiv Sena's 3rd list announced by Uddhav Thackeray, opportunity given to Muslim candidate
विधानसभा निवडणुकीचंं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 20 नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे
तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून अनेक जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील उमेदवारांची घोषणा करताच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाल्याचं समोर आलं आहे.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून हरून खान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हरून खान यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर नाराज झाले आहेत.
ते ठाकरे गटाकडून वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र या मतदारसंघातून हरून खान यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आता राजू पेडणेकर हे सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजू पेडणेकर तीन वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत,
ते यावेळी वर्सोवातून पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं ते आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान दुसरीकडे मुंबईमध्ये भाजप विधानसभेच्या 18 जागा लढवणार आहे. यापैकी विधानसभेच्या 14 मतदारसंघात भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर अद्याप चार जागांवर उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा होत असताना आता अंतिम याद्यांमधून नावे जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने
आज दुसरी यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
तर, मलबार हिल या जागेवरुन अद्यापही महाविकास आघाडीत अंतिम निर्णय झाला नसताना, ठाकरे गटाकडून भैरू चौधरी यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून आज तिसऱ्या यादीत 3 उमेदवारांची नावे जाहीर झाली असून हे तिन्ही उमेदवार मुंबईतील आहेत. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागांवर
लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्यानुसार, आता उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत.
मुंबईतील जागा वाटपाबाबत मविआत अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. आतापर्यंत महाविकास आघाडीकडून मुंबईतील 24 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून 19 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, काँग्रेसनं 4 जागा
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं एका जागेवर उमेदवार दिली आहे. ठाकरेंकडून आज 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
या तीन नावांवर महाविकास आघाडीत शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील 19 जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत.
माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
१६४ वर्सोवा – हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
१६७ विलेपार्ले – संदिप नाईक
आतापर्यंत ठाकरे गट मुंबईतील लढणाऱ्या जागा
1. भायखळा
2. शिवडी
3. वरळी
4. वडाळा
5. दादर माहीम
6. मागाठाणे
7. विक्रोळी
8. भांडुप पश्चिम
9. जोगेश्वरी पूर्व
10. दिंडोशी
11. अंधेरी पूर्व
12. चेंबूर
13. कुर्ला
14. वांद्रे पूर्व
15. कलिना
16. गोरेगाव
17. वर्सोवा
18. घाटकोपर पश्चिम
19. विलेपार्ले
दरम्यान, मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भैरू चौधरी यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे, एकूण 20 जागा शिवसेना ठाकरे गट मुंबईत लढत असल्याचे आत्तापर्यंतच्या यादीनुसार स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसनं मालाड पश्चिम,चांदिवली,मुंबादेवी,धारावी या चार जागांवर उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर, काँग्रेसने आज तीन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
त्यामुळे, काँग्रेसच्या 7 जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे.