जागावाटपाचा तिढा ;ठाकरेंविरोधात काँग्रेसचे नेते दिल्लीत
Seat sharing rift; Congress leaders against Thackeray in Delhi

विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याला आता जेमतेम चार दिवस उरले आहेत. असे असतानाही महाविकास आघाडीतले जागावाटपाचे अंतिम समीकरण ठरत नसल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह नेतेही बुचकाळ्यात पडलेत.
महाविकास आघाडी पहिल्यांदाच एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याने एकमेकांच्या जागांवर दावेप्रतिदावे होत असल्याने पक्षातील नेते मंडळींची मार्ग काढताना चांगलीच दमछाक होते आहे.
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. जागावाटपाच्या अनेक बैठकींमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक फैरी झडत आहेत. विशेष करून मुंबई आणि विदर्भातील काही जागांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे.
अर्ज भरण्याला मोजकेच दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत हा वाद पक्षासाठी परवडणारा नाही, असे म्हणत नागपूरमधील स्थानिक नेते थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत.
नागपूर पूर्व तसेच नागपूर दक्षिणच्या बचावासाठी काँग्रेसचे पथक दुसऱ्यांदा दिल्लीत धडकले आहे. आमदार विकास ठाकरे आणि अभिजीत वंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. मित्र पक्षाचा सन्मान करतो पण वास्तविकता पाहून निर्णय घ्या, काँग्रेसच्या जागा कमी करू नका, अशी विनंती काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून ज्येष्ठ नेत्यांना करण्यात आली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाची जागा आली आहे. येथून राष्ट्रवादीने शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांची उमेदवारी जाहीर केली आहे
तर नागपूर दक्षिणचा पेच अजूनही कायम आहे. दक्षिणसाठी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. दक्षिणची जागा काँग्रेसच लढेल तर पूर्व नागपूरबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू असे आश्वासन काँग्रेस नेत्यांनी दिल्याची माहिती आहे.