एका विधानामुळे अजित पवारांनी कापले त्यांच्या विश्वासू विद्यमान आमदाराचे तिकीट? पाहा Video

Ajit Pawar cut his trusted sitting MLA ticket due to a statement? Watch the video

 

 

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवारांची यादी टप्प्या टप्प्यात जाहीर केली जात आहे. जागावाटपाचा तिढा ज्या पद्धतीने सुटतोय तशा तशा याद्या जाहीर होत असतानाच

 

अजित पवारांच्या पक्षाच्या एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट झाला आहे. विशेष म्हणजे यामागील कारण महिलांबद्दल केलेलं एक वादग्रस्त विधान असल्याचं सूत्रांचं सांगणं आहे.

 

महायुतीमधील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा पत्ता कट झाला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने वरुड-मोर्शी मतदारसंघातून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार अपक्ष म्हणून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

 

तिकीट नाकारुन आमदार देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जोरदार झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खरं तर भुयार हे उपमुख्यमंत्री अजित पवार

 

यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. मात्र मध्यंतरी महिलांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य केल्याने आमदार देवेंद्र भुयार यांची उमेदवारी कापल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच भुयार यांनी जाहीर सभेत केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं होतं. भुयार यांनी मुलींच्या दिसण्याबद्दल केलेल्या विधानावरुन विरोधकांनाही त्यांच्यावर निशाणा साधला होता.

 

मात्र भुयार यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगत स्वत:चा बचाव केला. एका जाहीर सभेतील भुयार यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झालेला. त्यामध्ये त्यांनी,

 

“लग्नाला मुलगी हवी असेल तर मुलगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट असेल, सुंदर असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. ती नोकरीवाल्यांना भेटतो.

 

दोन नंबरची पोरगी कोणाल तर ज्यांचा पानठेला, धंदा, दुकान आहे त्यांना! तीन नंबरची गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्याच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही,”

 

असं विधान केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. हा व्हिडीओ 2 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भुयार यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

 

 

भुयार यांनी या प्रकरणानंतर स्पष्टीकरण देताना, “मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये एका जाहीर कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या ‘त्या’ विषयावरील हे विधान आहे.

 

या विधानाचा आता कुठेही काहीही संबंध नाही. महिलांचा अपमान किंवा टीका करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यावेळी पोरांना लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती.

 

म्हणूनच तेव्हाची वास्तुस्थिती मांडली,” असं म्हटलं होतं. मात्र हेच विधान आता भुयार यांना भोवलं असून ते आता अपक्ष म्हणून लढणार आहेत. पाहा या आमदाराचा व्हायरल झालेला व्हिडीओ…

 

 

आमदार देवेंद्र भुयार यांनाही आपल्याला डावललं जाईल याची कल्पना होती असं मानलं जात आहे. देवेंद्र भुयार यांच्या सोशल मीडिया पोस्टरवरून अजित पवार आणि घड्याळ चिन्ह गायब असल्याचं दिसत आहे.

 

मात्र भुयार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांच्याबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच भुयार यांना चिन्हावर लढू देण्यास अजित पवारांचा पक्ष फारसा सकारात्मक नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *