प्रफुल्ल पटेल यांचेही दाऊदच्या लोकांशी व्यवहार
Praful Patel's dealings with Dawood's people too
नागपुरात सदनात एकत्र बसतात आणि एकमेकांना पत्र लिहीत आहे. पत्राचार करत आहेत. बाजूबाजूला बसून पत्र लिहीत आहेत. हे ढोंगच आहे. उभं राहून सांगा नवाब मलिक किंवा अजित पवार यांना आम्ही सहन करणार नाही.
भाजप वारंवार ढोंग करत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नवाब मलिक यांच्यावरून पत्र लिहिलं होतं. त्यावर ते बोलत होते.
प्रफुल्ल पटेल यांचेही दाऊदच्या लोकांशी व्यवहार, पटेलांबाबत मत काय?; संजय राऊत यांनी घेरलं ,राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत चांगलीच जुंपली आहे.
मलिक काल विधानसभेत अजितदादा गटाच्या बाकांवर जाऊन बसले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. मलिक यांचे दाऊदशी संबंध होते. देशद्रोह्याशी संबंध असलेल्यांसोबत आम्ही बसू शकत नाही, असा इशाराच फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
फडणवीस यांच्या या विधानाची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावरही मलिकांसारखेच आरोप आहेत. त्यांचेही दाऊदच्या लोकांशी व्यवहार आहेत, मग पटेलांबाबत तुमचं मत काय? असा सवाल करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली आहे.
नवाब मलिकांवर तुम्ही हल्ला करता. पण त्याच प्रकारची केस आणि खटला प्रफुल्ल पटेलांवर आहे. त्यांचाही दाऊदच्या लोकांशी जमिनीचा व्यवहार आहे. याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. पटेलांची मालमत्ताही ईडीने जप्त केली आहे. प्रफुल्ल पटेल यूपीएत मंत्री होते तेव्हा याच मुद्द्यावर भाजपने सोनिया गांधींकडे सवाल केला होता.
हाच मुद्दा होता. मग पटेल बाबत तुमचं मत काय आहे? हे मी फडणवीस यांना विचारतो, असंसंजय राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींनीच प्रफुल्ल पटेलांवर हल्ला केला होता.
तेच पटेल मोदी गोंदियात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला आले होते. हे कसं चालतं? तुम्ही फक्त टार्गेट मलिकांना केलं. भाजपची वॉशिंग मशीन बंद आहे असं वाटतंय, असा चिमटाही त्यांनी काढला.
हसन मुश्रीफ, 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार, प्रताप सरनाईक, ईडी ज्यांना अटक करणार होत्या त्या भावना गवळी, कितीतरी नावे घेतली जाईल. नैतिकतेचाच मुद्दा असेल तर तुम्ही ज्यांच्यासोबत सरकार बनवलंत त्या सर्व करप्ट पार्टी आहेत. म्हणून मी म्हणतो हे ढोंग आहे, अशी टाकी त्यांनी केली.
सध्या नागपूरला लबाड लांडगं ढोंग करतंय बाकी सर्व सोंग करतंय, असं सुरू आहे. ढोंग आणि सोंग सुरू आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मंत्रीही होतेच. त्यांच्यावर जे आरोप आहेत ते सिद्ध व्हायचे आहेत. मलिक यांच्या संदर्भात अजित पवार आणि जयंत पाटील यांनी त्यावेळी भूमिका घेतली होती.
आरोप सिद्ध झाले नाहीत, त्यांना आरोपी ठरवता येत नाही. तेव्हा विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी यांनी भाषणं केली होती. भाजपच्या पाळलेल्या टोळ्यांनी त्यावेळी मलिकांविषयी विधान केलं ते पाहण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले.
काल अजित पवार गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यामुळे भाजपचे नैतिकतेचे बुडबुडे आता बुडबुड करत आहेत. हे ढोंग आहे. पूर्णपणे ढोंग आहे. एखाद्या कपटी कोल्ह्याने वाघाचं कातडं फोडून नैतिकतेच्या डरकाळ्या फोडाव्यात तसा हा प्रकार आहे.
काय तर म्हणे सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा. भाजपने नवीनच माहिती दिली आहे. या देशातील 140 कोटी जनतेला माहीतच नाही देश महत्त्वाचा आहे. हे भाजपने पहिल्यांदाच सांगितलं. म्हणजे आम्ही काय मूर्खच आहोत का? आम्हाला देश माहीत नाही का? असा सवाल त्यांनी केला.