प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान;विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार
Prakash Ambedkar's big statement; OBC reservation will be stopped after the assembly
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे
. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे.
वंचितने अनेक उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. एकीकडे निवडणुकांची धामधूम असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया पार पडल्या. आता प्रकाश आंबेडकरांनी रुग्णालयातूनच जनतेला एक मोलाचा संदेश दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मतदारांना एक मोलाचा संदेशही दिला आहे. “मी सध्या आयसीयूमध्ये आहे.
अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे.
ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा”
, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते हॉस्पिटलमध्ये दाखल असून, आयसीयूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे.
“दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे.
या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो.
आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा”, अशी सादही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला घातली आहे.