फडणवीस-शिंदेचेही ऐकल नाही ;आता ठाकरे पुत्राच्या विरोधात मैदानात ;काय कारवाई होणार ?
Fadnavis-Shinde will not be heard; now in the field against Thackeray's son; what action will be taken?
मुंबईतील दादर-माहीम मतदारसंघात सध्या चांगल्याच हाय व्होल्टेज घडामोडी बघायला मिळत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ अंतिम टप्प्यावर आली असताना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांचे चिरंजीव आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. पण राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याची माहिती आहे.
राज ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीकडून काही जागांवर पाठिंबा मिळणं अपेक्षित आहे. पण खुद्द राज ठाकरे यांच्या चिरंजीवालाच शिवसेनेचे सदा सरणकर यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं.
सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर मनसेकडून अमित ठाकरे यांना त्याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. यानंतर ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली.
त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होईल, अशी चर्चा सुरु झालेली. या दरम्यान, भाजप नेत्यांनी सदा सरवणकर यांना अर्ज मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं. पण सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार झाले नाहीत.
विशेष म्हणजे सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला सदा सरवणकर यांना बोलावण्यात आलं होतं.
यावेळी सदा सरवणकर यांना विधान परिषदेवर संधी देऊ, असं आवाहन करण्यात आलं होतं. पण सरवणकर आपली उमेदवारी मागे घेण्यास तयार नव्हते, अशी माहिती समोर आली होती.
विशेष म्हणजे सदा सरणकर यांनी ट्विट करत राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याचं याआधी बघायला मिळालं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कोणत्या नातेवाईकासाठी कुणाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं नाही,
असा टोला सदा सरणकर यांनी लगावला होता. यानंतर राज ठाकरे यांनी शिंदे गटाच्या विरोधात राज्यभरात दिलेले सर्व उमेदवार मागे घ्यावेत तरच मी उमेदवारी अर्ज मागे घेईन,
अशी भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली होती. यानंतर शिवसेना भवनबाहेर आज सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, असं आवाहन करणारी बॅनरबाजी केली होती.
या सर्व घडामोडी घडल्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अतिशय कमी वेळ शिल्लक असताना
सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले. पण राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. “मी सरवणकर यांची भेट घेणार नाही.
तुम्हाला उभं राहायचं असेल राहा किंवा राहू नका. मला काही बोलायचं नाही”, असं राज ठाकरे म्हणाल्याची माहिती खुद्द सदा सरवणकर यांनी मांडली. राज ठाकरे यांनी आपली भेट नाकारल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं.
सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने आता शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
कारण भाजपचा मनसे उमेदवारासाठी दबाव आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी सरवणकरांची भेट नाकारल्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट आहे. सदा सरणकर यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची देखील
नाराजी शिवसेनेने ओढावून घेतली आहे. अशा परिस्थितीत आता एकनाथ शिंदे सदा सरवणकर यांची पाठराखण करतात की पक्षातून हकालपट्टी करतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.