महायुतीच्या मंत्र्यांचे अख्खं कुटुंबच निवडणुकीत ;एक बंधू भाजपकडून, एक काँग्रेसकडून, लेक अपक्ष
The entire family of the ministers of the Grand Alliance is in the election; one brother is from BJP, one is from Congress, one is independent.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या परिवाराचा एक सदस्य उमेदवारी करीत असून, प्रमुख शर्यतीत आहे.
मंत्री डॉ. गावित भाजपकडून, त्यांचे एक बंधू काँग्रेसकडून, दुसरे अपक्ष आणि कन्यादेखील अपक्ष उमेदवारी करीत आहे. त्यामुळे या लढतींची राज्यभरात चर्चा रंगत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात गावित कुटुंबाचा दबदबा आहे. मात्र, यंदा गावित कुटुंबातील चार सदस्य विविध विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करीत असल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
मंत्री डॉ. विजयकुमार गावित सहावेळा नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. यंदाही त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ते नंदुरबारमधून उमेदवारी करीत असून,
मंत्री गावित यांचे एक बंधू राजेंद्रकुमार गावित यांनी विधानसभेपूर्वी भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांना शहादा विधानसभेसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
यापूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी केली होती. मात्र, त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्या उमेदवारीला महाआघाडीतील अनेक नेत्यांनी विरोध केला होता.
मात्र, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबार येथे येत बंड शांत केले. पण, वरून बंड शांत असले, तरी अनेकांची नाराजी दूर झाली नसल्याचे चित्र आहे.
डॉ. गावित यांचे दुसरे बंधू शरद गावित नवापूर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी करीत आहेत. शरद गावित यांनी २००९ मध्ये समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी करीत काँग्रेसचे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या पराभव केला होता.
डॉ. गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित या दहा वर्षे भाजपच्या खासदार होत्या. त्या नुकत्याच भाजपचा राजीनामा देऊन अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करीत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील एकाच प्रस्थापित परिवारातील चार सदस्य यंदा विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्याने येथील निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
डॉ. विजयकुमार गावित आणि राजेंद्रकुमार गावित या भावांमध्ये अनेक दिवसांपासून सख्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकसभेच्या वेळीही राजेंद्रकुमार गावित यांनी खासदारकीसाठी मुलाखत दिली होती.
मात्र, डॉ हीना गावित यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाली होती. डॉ. गावित यांचे दुसरे बंधू शरद गावित यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. एकंदरीतच गावित परिवारातील चार सदस्य चार विधानसभा क्षेत्रांत उमेदवारी करीत असले,
तरी सर्वांची राजकारणाची दिशा मात्र वेगळी आहे. डॉ. गावित यांचे आजोबा दाबल्या पोसल्या गावित आमदार होते. काका तुकाराम हुरुजी गावित दोनवेळा खासदार होते. डॉ. गावित यांचे सासरे रमेश पाण्या वळवी नंदुरबार मतदारसंघातून तीनवेळा काँग्रेसचे आमदार व मंत्री होते.