शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Fatal attack on husband of former corporator supporting Sharad Pawar
पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला झाला आहे. पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघात हा प्रकार घडला. माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर हल्ला झालाय.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश करून वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांनी भर दुपारी हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीवर दगडफेक केली. यामुळे चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीचे काच फोडून दगड टिंगरे यांना लागला. या दगडफेकीत चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत.
गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या उपस्थित त्यांनी हा पक्षप्रवेश करून वडगाव शेरीचे उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे यांचा प्रचार सुरू केला होता.
प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्यानंतर गाठीभेटीवर भर दिला जात आहे. मतदार राजाला प्रत्यक्ष भेटले जात आहे. चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचा कार चालक सचिन गायकवाड दुपारी एमएसईबी ऑफिसकडे गेले होते.
त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठिमागून कारवर दगड मारला. तेव्हा कार चालक घाईने उतरला पाठिमागे गेला.
त्याचवेळी समोरून देखील सिमेंटचा गट्टू काचेवर मारून तोडफोड केली. या दगडफेकीत चंद्राकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे वडगाव शेरी परिसरातील वातावरण तापलं असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, नागपुरात काटोल येथे देखील शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी अनिल देशमुख यांच्या गाडीच्या दिशेला दगडफेक केली. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती.